नीना गुप्ता आणि संजय मिश्रा सध्या त्यांच्या क्राइम-थ्रिलर ‘वध’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हे दोघेही ‘वध’मध्ये एका जोडप्याची भूमिका साकारणार आहेत. ते जोडपं एक सामान्य जीवन जगत असतं, पण अचानक एका खुनाच्या प्रकरणात सापडतं. त्यानंतर ज्या गोष्टी घडतात, त्यावर आधारीत हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे, असं नीना गुप्ता यांनी म्हटलंय.
चित्रपट आणि त्यातील पात्रांबद्दल बोलताना संजय मिश्रा म्हणाले की, “मी आणि नीना एका जोडप्याची भूमिका साकारतोय. आम्ही साकारत असलेले पात्र प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या पालकांची आठवण करून देतील. चित्रपटात माझं नाव शंभूनाथ मिश्रा आहे. या जोडप्याचं नातं खूप सुंदर आहे आणि ते एकमेकांना सांभाळून घेतात. ते एकमेकांसाठी जगतात आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. हे एक सुंदर नातं आहे आणि मला वाटतं की बहुतेक जोडपी अशीच असतात,” असं त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.
दरम्यान, अलीकडील काही गुन्ह्यांमुळे चित्रपट हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याची टीका होत आहे. पण नीना गुप्तांनी हे आरोप फेटाळले आणि कोणत्याही कलेप्रमाणेच चित्रपट देखील समाजात काय घडत आहे, हेच दाखवत असल्याचं म्हटलंय. “चित्रपट असो, शो असो किंवा अगदी पेंटिंग असो, हे सर्व आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ते दाखवते. सासू सुनांचे शो इतके चांगले का चालतात असं तुम्हाला वाटतं? कारण बऱ्यापैकी सर्व महिला अशाच समस्यांमधून जात आहेत. त्यामुळे त्या कनेक्ट करतात. जर चित्रपटात हिंसाचार दाखवला जात असेल, तर त्याचं कारण म्हणजे आजूबाजूला हिंसाचार घडत आहे,” असं नीना गुप्ता म्हणाल्या.
‘बिग बॉस’शी बोलताना ढसाढसा रडला शिव ठाकरे; वीणाचं नाव घेत म्हणाला, “तिला…”
अलीकडेच श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाने ‘डेक्सटर’ नावाची वेब सीरिज पाहून खून केल्याचं सांगितलं होतं. त्यावरून नीना गुप्ता म्हणाल्या, “कोणत्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीपासून प्रेरणा मिळते, हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असते. आम्ही चांगल्या गोष्टीही दाखवतो ना, त्यापासून प्रेरणा का घेत नाहीत. आई-वडिलांचे पाय दाबणं पण दाखवलं जातं, पण चित्रपटांमधून ही नैतिक मूल्ये लोक का शिकत नाहीत. मला वाटते की त्यांच्या डोक्यात समस्या आहे आणि त्यांना डॉक्टरांची गरज आहे. कारण चित्रपट पाहून गुन्हेगारी कृत्य करण्याची प्रेरणा मिळाली हे विश्वास ठेवण्यासारखं नाही,” असं स्पष्ट मत नीना यांनी मांडलं.