बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. गेली अनेक वर्ष त्या सातत्याने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आहेत. नीना गुप्ता या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय असतात. एका मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या. नीना गुप्ता यांनी फेमीनिजमविषयी आणि स्त्री-पुरुष समानतेबद्दल भाष्य केलं ज्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत.
प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्ट शोवर नीना गुप्ता यांनी हजेरी लावली. याबरोबरच प्रेम म्हणजे नेमकं काय? स्त्रिया यात कशा गुंततात तसेच शारीरिक संबंध कधी आणि कोणासाठी गरजेचे असतात अशा वेगवेगळ्या विषयांवरही त्यांनी भाष्य केलं. आजही बऱ्याच स्त्रिया या प्रेम नसतानाही विवाहबंधनात अडकल्या आहेत ही खंतदेखील त्यांनी व्यक्त करून दाखवली. याबरोबरच कोणतेही रोमॅंटिक नाते हे वासनेपासूनच सुरुवात होते, एकमेकांबद्दलचं शारीरिक आकर्षण अन् त्यातून निर्माण होणारं नातं हे प्रथम वासनेवरच बेतलेलं असतं असंही नीना गुप्ता या मुलाखतीमध्ये म्हणाल्या.
आणखी वाचा : रणबीरच्या ‘अॅनिमल’मधील ‘अर्जन वेल्ली’ गाणं मुघलांविरुद्ध लढताना गायलं जायचं; वाचा यामागील इतिहास
शिवाय त्यांच्या पिढीचा सेक्सकडे पाहायचा दृष्टिकोनही वेगळाच होता. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “आमच्या पिढीला सेक्सची गरज फारशी नव्हती, आपल्या पतीला खुश ठेवणे हे जणू आमचे कामच होते. त्यावेळी कुणीच आम्हाला आमच्या सुखाचा विचार करायला प्राधान्य द्यायला शिकवलं नाही. आमच्या काळात तर ही गोष्ट फारच कठीण होती. स्वतःच्या पतीला खुश ठेवणं हीच फार महत्त्वाची गोष्ट होती. त्या नात्यात रोमान्स नसायचा, स्त्रियांना रोमान्स हवाहवासा वाटायचा परंतु त्याकडे फारसं कुणीच लक्ष देत नसे, शेवटी स्त्रियांनी त्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली व सर्व लक्ष आपल्या मुलांच्या पालन-पोषणाकडे दिले.”
आता मात्र चित्र बदलताना दिसत आहे, स्त्रिया बाहेर फिरायला जातात, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र झाल्या आहेत. विशेष म्हणजे जोडीदार असो किंवा नसो स्वतः आनंदी कसं राहायचं हे स्त्रिया शिकल्या आहेत हे निरीक्षणही नीना गुप्ता यांनी या मुलाखतीमध्ये मांडले. नीना गुप्ता नुकत्याच सोनी लीव्हच्या ‘चार्ली चोप्रा’ व नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ या सीरिजमध्ये झळकल्या होत्या. दोन्ही चित्रपटात नीना यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली.