बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. गेली अनेकवर्ष त्या सातत्याने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आहेत. नीना गुप्ता या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
बरेली विमानतळावर राखीव लाऊंज (आरक्षित विश्रामगृह) मध्ये प्रवेश न मिळाल्याची माहिती नीना यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपण व्हीआयपी नसल्याने याठिकाणी आपल्याला प्रवेश नाकारल्याचं नीना गुप्ता यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
आणखी वाचा : फेसबुक, इंस्टाग्रामच्या जमान्यातसुद्धा ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटीज सोशल मीडियापासून आहेत कोसो दूर
या व्हिडीओमध्ये नीना गुप्ता म्हणतात, “नमस्कार मी सध्या बरेली विमानतळावर आहे, आणि हा राखीव लाऊंज आहे जिथे मी कधीकाळी गेले होते, पण आज मात्र मला इथे प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा लाउंच फक्त व्हीआयपी लोकांसाठी असतो, कदाचित मी अजून तेवढी पात्र नसेन, मला व्हीआयपी म्हणून ओळख मिळवण्यास आणखी परिश्रम घ्यावे लागतील. याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद.”
नीना गुप्ता यांच्या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी कॉमेंट करत त्यांना पाठिंबा दिला आहे. “तुम्ही जिथे कुठे असाल तो व्हीआयपी एरिया बनेल” असं एका चाहत्याने कॉमेंटमध्ये लिहिलं आहे. तर काही लोकांनी विमानतळावरील व्यवस्थापनावर टीकाही केली आहे. नीना गुप्ता या गेल्या ४ दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. नुकत्याच नीना या नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज २’ व विशाल भारद्वाज यांच्या ‘चार्ली चोप्रा’ या सीरिजमध्ये झळकल्या.