अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अतरंगी स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. याच स्वभावाच्या जोरावर तो चित्रविचित्र कपडे घालून आत्मविश्वासाने वावरत असतो. तो सध्याचा बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता आहे. त्याचा ‘८३’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामध्ये तो भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत होता. त्याला या भूमिकेसाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले. दरम्यान एका पुरस्कार सोहळ्यामधला त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो भालाफेकपटू नीरज चोप्रासह डान्स करताना दिसत आहे.
सीएनएन न्यूज १८ आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये रणवीरला ‘८३’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. या सोहळ्याला कपिल देव, नीरज चोप्रा यांच्यासह क्रिडा विश्वातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरही या कार्यक्रमाला हजर होते. कपिल देव यांच्या हस्ते रणवीरला पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राचाही गौरव करण्यात आला. तेव्हा रणवीर सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होता. त्याने हसत “माझ्या मते, नीरज त्याच्या बायोपिकमध्ये स्वत: काम करु शकतो. नीरज चोप्रा, इन अँड अॅज नीरज चोप्रा”, असे विधान केले.
पुढे त्याने नीरजला नाचायला लावले. सुरुवातीला त्याने संकोच केला. पण हळूहळू तो रणवीरच्या डान्स स्टेप्स कॉपी करत नाचू लागला. रणवीरने नाचता-नाचता त्याला उचलून घेत मिठी मारली. नीरजचा डान्स पाहून त्याने “तू मुख्य डान्सर आहे. मी तुझ्यामागे नाचणारा बॅकग्राऊंड डान्सर आहे”, अशी प्रतिक्रिया दिली. तेव्हा चाहत्यांनी हे क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतले. त्यांचा नाचतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक कमावत इतिहास रचला होता. ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज देशातील पहिला खेळाडू ठरला होता. या कामगिरीमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली.