अनेक बॉलीवूड आणि पंजाबी गाण्यांना आपल्या आवाजाने स्वरबद्ध करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे नेहा कक्कर (Neha Kakkar). आजवर आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. चित्रपट व अल्बम्समध्ये गाणं गाण्याशिवाय गायिका अनेक ठिकाणी गाण्याचे लाईव्ह शोजही करत असते आणि तिच्या या लाईव्ह शोला रसिकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो.

आपल्या गाण्यांनी चर्चेत राहणारी ही गायिका दोन दिवसांपुर्वी तिच्या गाण्याच्या कार्यक्रमात उशिरा पोहोचली आणि यामुळे तिला स्टेजवरच रडू कोसळलं होतं. खरंतर ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये नेहा कक्करच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र ती स्वत:च्या शोसाठी तब्बल तीन तास उशीरा पोहोचली. यामुळे तिची वाट पाहून वैतागलेले प्रेक्षक प्रचंड भडकले होते

यानंतर नेहा स्टेजवर आली तेव्हा सगळ्यांनी तिला परत जाण्यास सांगितलं. यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. नेहाने तिच्या चुकीबद्दल चाहत्यांची माफीही मागितली मात्र तरीही लोकांचा विरोध काही थांबला नाही आणि लोकांच्या निषेधानंतर ती स्टेजवरच रडू लागली. अशातच तिने याप्रकरणी भाष्य केलं आहे. याबद्दल नेहाने पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “त्यांनी सांगितले की मी ३ तास ​​उशिरा आली. पण त्यांनी एकदाही विचारले का माझे काय झाले? त्यांनी माझे आणि माझ्या बँडसाठी काय केले? जेव्हा मी स्टेजवर बोलली तेव्हा मी कोणालाही आमच्याबरोबर काय झाले ते सांगितले नाही. कारण मला कोणालाही दुखवावे असे वाटत नव्हतं. पण आता हे प्रकरण माझ्या नावावर आले आहे, त्यामुळे मला याबद्दल बोलायचे होते आणि ते इथे आहे.”

यानंतर ती असं म्हणाली आहे की, “तुम्हाला माहिती आहे का? की मी माझ्या मेलबर्नमध्ये प्रेक्षकांसाठी अगदी मोफत सादरीकरण केले. आयोजक माझे आणि इतरांचे पैसे घेऊन पळून गेले. माझ्या बँडला जेवण, हॉटेल आणि पाणीही दिले गेले नाही. माझे पतीने त्यांच्यासाठी जेवणाची सोय केली. तुम्हाला माहिती आहे का आमच्या कार्यक्रमाआधी आवाज तपासणीला काही तास उशीर झाला, कारण त्यासाठी पैसे दिले गेले नव्हते आणि त्याने ध्वनी तपासणी करण्यास नकार दिला.”

यापुढे ती म्हणाली की, “मग खूप विलंबानंतर आमची ध्वनी तपासणी सुरू झाली, तेव्हा मी कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नाही, ध्वनी तपासणी करू शकले नाही, आम्हाला हेदेखील माहित नव्हते की कॉन्सर्ट सुरू आहे की नाही, कारण आयोजकांनी माझ्या व्यवस्थापकाचे फोन उचलणे बंद केले होते. शेअर करण्यासाठी अजून बरेच काही आहे, पण मला वाटते की हे इतके पुरेसे आहे.”

यापुढे नेहाने म्हटलं आहे की, “माझ्यासाठी आणि माझ्या बाजूने बोलणाऱ्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. त्यादिवशी माझ्या संगीत कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि माझ्याबरोबर रडलेल्या तसंच मनापासून नाचणाऱ्या सर्वांचीच मी नेहमी आभारी राहीन. माझ्या चाहत्यांचेही मी माझ्या बाजूने उभे राहिल्याबद्दल आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानते. धन्यवाद.”