प्रभासचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर आज (१६ जून ) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. भारतात या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगही हाऊसफुल्ल झाले होते. मात्र, या चित्रपटावरून नेपाळमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात सीतेच्या जन्मस्थानाबाबत केलेल्या एका दाव्याला नेपाळ सरकारने विरोध केला आहे.
हेही वाचा- ‘आदिपुरुष’ भारतीय बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडणार का? कोणत्या गोष्टी ठरतील फायदेशीर? वाचा आकडेवारी
‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या काही दृश्यांना सुरुवातीला भारतात मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांमध्ये बदल केला होता. आता या चित्रपटातील सीतेच्या जन्मस्थानाबाबतच्या दृश्यावरून नेपाळमध्ये वाद सुरू झाला आहे. काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना इशारा दिला आहे. ओम राऊत यांनी चित्रपटात सीतेच्या जन्मस्थानाबाबत केलेली चूक सुधारली नाही तर नेपाळमध्ये कोणताच हिंदी चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
बलेन शाह यांनी नेपाळीमध्ये ट्वीट करत लिहिले, “जोपर्यंत दक्षिण भारतीय चित्रपट ‘आदिपुरुष’मधील ‘जानकी भारत की बेटी है’ हा डायलॉग काढला जात नाही तोपर्यंत काठमांडूमध्ये कोणताही हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार नाही. ही चूक दुरुस्त करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. जय माता सीता.”
या संदर्भात नेपाळच्या सेन्सॉर बोर्डानेही ‘आदिपुरुष’ चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. रामायणानुसार माता सीतेचा जन्म नेपाळमधील जनकपूर येथे झाला होता. मात्र, सीतेला भारताची कन्या म्हणून वर्णन करणारा भाग ‘आदिपुरुष’मधून काढून टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पास केला आहे.
दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम् आणि कन्नडमध्ये टू डी आणि थ्रीडीमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत. यामध्ये सनी सिंगने लक्ष्मणाची तर देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.