OMG 2 Trailer Reactions : अक्षय कुमारच्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओ माय गॉड’ (OMG) चित्रपटाच्या सीक्वेलची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ‘ओ माय गॉड’चित्रपटाचा सीक्वेल ‘OMG 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘OMG 2’ या चित्रपटाचे संपूर्ण कथानक कांती शरण मुदगल यांच्या कुटुंबावर आधारित आहे हे ३ मिनिटांचा ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. ट्रेलरमधील अक्षय कुमारच्या शिवअवताराने लोकांची मने जिंकली आहेत. कांती शरण मुदगल यांच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाल्याने त्याला शाळेतून काढून टाकले जाते. यानंतर कांती शरण यांचा मुलगा आत्महत्या करण्यासाठी गेल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्याला शाळेतून सुद्धा काढून टाकले जाते. यानंतर कांती शरण देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून थेट न्यायालयात याचिका करतात.
त्यामुळे कांती शरणला न्याय मिळणार का? भगवान शिवशंकरांचा दूत असलेला अक्षय कुमार त्यांना कशी मदत करणार? या सगळ्याची उत्तरं आपल्याला चित्रपटात मिळतील. एकूणच गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘ओह माय गॉड २’चा हा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. बऱ्याच लोकांना हा चित्रपट आपल्या हिंदू धर्माचा अपमान करेल अशी शंका होती, पण ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनातील शंका दूर झाली आहे.
प्रेक्षकांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून ते हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंद उत्सुक आहेत. इतकंच नव्हे तर एका युझरने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, “गदर २ ला यावेळी चांगलीच टक्कर मिळणार आहे.” याबरोबरच चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांचं काम आणि अक्षय कुमारचा लूक दोन्ही लोकांना भरपूर पसंत पडला आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) अर्थात सेन्सॉर बोर्डाने OMG 2 ला ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. ११ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठींसह यामी गौतम, गोविंद नामदेव आणि अरुण गोविल यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.