प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ आज (१६ जून रोजी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी प्रभासने साकारलेल्या श्रीरामाच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे तर काही जण या चित्रपटाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. तर दुसरीकडे चित्रपटात रावणाची भूमिका साकारलेल्या सैफ अली खानच्या लूकची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. लांब केस, डोळ्यांत काजळ, दहा डोकी असलेला सैफचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘आदिपुरुष’मध्ये सैफ अली खानचा रावणाचा लूक लोकांना आवडला नाही. नेटकऱ्यांची त्याच्या लूकची खिल्ली उडवली आहे. अनेकांनी त्याच्या लूकची तुलना मुघलांशी केली आहे. तर काहींनी त्याची तुलना कार्टूनशी केली आहे.
एका युजरने ट्विटरवर लिहिले आहे की, “रावणाचा लूक निराशाजनक आहे.” तर आणखी एकाने ‘आदिपुरुष’मधील सैफच्या लूकचा फोटो शेअर करत लिहिले,” हे प्रभू हे बनवणाऱ्या व्यक्तीच्या पोटात बाण मारा!”
रावणाच्या लूकमधील सैफ अली खानचा दहा डोक्यांचा फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत एका युजरने लिहिले की, “ओम राऊत, तुम्ही काय केले? सैफ अली खानला रावणाच्या लूकमध्ये जोकर बनवलं आहे.”
तर दुसरीकडे काही लोकांना सैफ अली खानचा अभिनय खूपच दमदार वाटला. सैफचा एक व्हिडीओ शेअर करताना एका युजरने सैफचं कौतुक केलं आहे. “सैफने चित्रपटात उत्तम अभिनय केला असल्याची कमेंट केली आहे.
‘रामायणा’वर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. प्रभासने या चित्रपटात श्रीराम तर क्रिती सेनॉनने सीतामातेची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमान तर अभिनेत्री तेजस्विनी पंडित शूर्पणखेच्या भूमिकेत आहे.