सध्या रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, जो प्रेक्षकांच्या चांगलाचं पसंतीस उतरला. तसेच या चित्रपटातील रणवीर-आलियाच्या ‘तुम क्या मिले’ या गाण्यानं सगळ्यांची मन जिंकली आहेत. पण अशातच चित्रपटातील एक सीन वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील एका सीनमध्ये नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. ट्रेलरमध्ये हा सीन पाहायला मिळत आहे. या सीनमध्ये रॉकी (रणवीर सिंह) ३ महिन्यांसाठी रानी (आलिया भट्ट)च्या घरी जातो. तेव्हा त्याचे लक्ष रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे फोटोकडे जाते आणि तो त्यांना रानीचे आजोबा म्हणून त्यांचा पाया पडतं असतो. हा सीन विनोदी शैलीतून दाखवण्यात आला आहे. हेच नेटकऱ्यांना आता खटकलं आहे.
हेही वाचा – Video “सगळे एका माळेचे मणी…”; सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं परखड मत
नेटकऱ्यांनी या सीनमुळे करण जोहरवर टीकास्त्र सोडलं आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “बॉलीवूड कधीच भूतकाळातून शिकणार नाही. रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान कसा करू शकता? भारताच्या इतिहासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अशा व्यक्तीचा अपमान हा सहन करू शकत नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “एखाद्या महान व्यक्तीचा अनादर करणे अजिबात मान्य नाही. तुम्हाला रवींद्रनाथ टागोर यांच्यावर विनोद करायचं धाडसं कसं काय झालं?” तसेच तिसऱ्यानं लिहिलं की, “ट्रेलर मजेशीर आहे, पण यातील एक सीन पाहून आश्चर्यचकीत झालो. पण चांगल्या उद्देशाने नाही.”
हेही वाचा – शाहिद कपूरच्या घरात भाड्याने राहणाऱ्या कार्तिक आर्यनने घेतले आलिशान घर; किंमत वाचून थक्क व्हाल
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर आणि आलिया व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. २८ जुलै हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.