‘आदिपुरुष’ हा चित्रपट गेले अनेक महिने चर्चेत आहे. अखेर हा बहुप्रतीक्षित चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी हा चित्रपट पाहून मात्र प्रेक्षकांची काहीशी निराशा झाल्याचं चित्र दिसत आहे. आता या चित्रपटाला चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे.
गेले अनेक दिवस या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होती. वेगवेगळ्या शहरांना भेटी देऊन त्याचबरोबर सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करीत हा चित्रपट पाहण्यासाठी ते प्रेक्षकांना आवाहन करत होते. मात्र या चित्रपटात दाखवण्यात आलेली दृश्यं अनेकांना खटकली. त्यावरून आता नेटकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.
क्रिती सेनॉनने ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यावर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या चित्रपटावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटातील संवाद, चित्रपटात वापरले गेलेले व्हीएफएक्स, कलाकारांचा अभिनय हे सगळंच नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेलं नाही. क्रितीच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी या चित्रपटावर टीका करायला सुरुवात केली.
एकाने कमेंट करत लिहिलं, “अरे प्रभास जरा हस. प्रभू श्रीराम कधीही त्यांच्या आयुष्यात असा चेहरा करून वावरले नसतील.” तर दुसरा म्हणाला, “या चित्रपटामध्ये गोरिला का दाखवले आहेत? तेही सर्व एकसारखे दिसणारे. वानरसेना काय नाश्ता करायला गेली?” तर आणखी एक जण म्हणाला, “देवाच्या नावावर पैसे कमावणारा बॉलीवूड.” आणखी एकाने लिहिलं, “असेच चित्रपट धर्माचं नाव खराब करतात.” तर आणखी एक जण म्हणाला, “रामायणाची तुम्ही मजा बनवून ठेवली आहे. एकीकडे दाढी नसलेला राम तर नंतर लगेच ट्रिम बीयर्ड असलेला राम.” तर आणखी एकाने लिहिलं, “आमचे प्रभू श्रीराम असे नक्कीच नाहीत जसे यांनी चित्रपटात दाखवले आहेत.”