अभिनेता रणबीर कपूर लवकरच ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा प्री-टीझर काल प्रदर्शित झाला. परंतु या प्री-टीझरमधील काही दृश्यं परदेशी चित्रपटातून चोरल्याचा आरोप नेटकऱ्यांनी दिग्दर्शकावर केला आहे.
गेले अनेक महिने रणबीर कपूरच्या या ‘अॅनिमल’ चित्रपटाबद्दल वेगवेगळे अपडेट्स समोर येत होते. या चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक पाहून हा चित्रपट काही तरी धमाकेदार असणार आहे, असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला होता. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. परंतु या चित्रपटाचा प्री-टीझर पाहून चाहत्यांची निराशा झाली आहे.
काल या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये रणबीर कपूर हातामध्ये कुऱ्हाड घेऊन मारामारी करताना दिसत आहे. हा टीझर पाहिल्यावर या टीझरमधील ॲक्शन सीन दक्षिण कोरियाच्या २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओल्डबॉय’ चित्रपटातून कॉपी केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे आणि त्यांनी या चित्रपटाच्या टीमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
एका नेटकऱ्याने हा प्री-टीझर आणि ‘ओल्डबॉय’ चित्रपटातील ॲक्शन सीन शेअर करा, “यांना काहीच ओरिजिनल करता येत नाही.” तर दुसरा म्हणाला, “‘ॲनिमल’ चित्रपटाचा प्री-टीझर हा ‘ओल्डबॉय’ चित्रपटाचा प्री-टीझर आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “तुम्हाला काहीच चांगलं करता येत नाही. तरी हा प्री-टीझर आहे म्हणून मी आत्ताच माझ्या अपेक्षा कमी केल्या आहेत.”