ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. दोन दिवसांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक या चित्रपटाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आहेत. आता देवदत्त नागेच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे, अभिनेत्री क्रिती सेनॉन ही सीतेच्या भूमिकेत दिसत आहे, तर हनुमानाची भूमिका मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे याने केली आहे. या चित्रपटात हनुमानाचे संवाद प्रेक्षकांना चांगलेच खटकले. त्या संवादांवरून प्रेक्षक लेखकावर आणि कलाकारांवर जोरदार टीका करत आहेत. तर या चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांना हा चित्रपट किती आवडला हे दाखवणारे व्हिडीओ पोस्ट करत आहेत.
आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…
देवदत्त नागेने नुकताच प्रेक्षक प्रतिक्रियांचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक आदिपुरुषचं कौतुक करताना दिसत आहेत. परंतु देवदत्त नागेने केलेली ही पोस्ट नेटकऱ्यांना आवडली नाही आणि त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकाने लिहिलं, “रामायणाचा हा अपमान आहे.” तर दुसरा म्हणाला, “तुम्ही एक कलाकार आहात. चित्रपटामध्ये तुम्हाला फक्त अभिनय करायचा असतो आणि बाकी सगळं लेखक दिग्दर्शकावर असतं. पण चित्रपटातील संवाद बोलताना तुम्हाला असं कधी वाटलं नाही की हा मारुतीरायाचा आणि आपल्या रामाचा अपमान आहे?”
तर आणखी एकजण म्हणाला, “हिंदू धर्माची बदनामी केली तुम्ही नागे जी.” तर आणखी एकाने लिहिलं, “थोडी तरी लाज वाटू द्या. बजरंगबली तुम्हाला माफ करणार नाहीत.” तर आणखी एक जण म्हणाला, “‘जय मल्हार’मधील तुमचं काम छान होतं पण ‘आदिपुरुष’मधले संवाद तुम्हाला तरी पटतात का? जलेगी तेरे बाप की वगैरे हनुमान कधी म्हणतात!” देवदत्तची ही पोस्ट आता चांगली चर्चेत आली आहे.