ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे २४ नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झाले. आंघोळीला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी (२६ नोव्हेंबर रोजी) त्यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती. अभिनेता सनी देओल कोहली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेला होता, पण त्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.
‘वूम्पला’ने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसतंय की सनी देओल व विंदू दारा सिंग आणि आणखी एकजण तिथे एकमेकांशी बोलत असतात, नंतर ते जोरात हसतात. तर त्यांच्या पुढे दिवंगत राजकुमार कोहली यांचा मुलगा अरमान उभा आहे आणि लोक त्याचे सांत्वन करत आहेत. मग सनी तिथून पुढे येतो आणि अरमानची भेट घेतो, नंतर ते तिथून पुढे जातात.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘ही पार्टी आहे का?’ ‘निर्लज्ज, मृत व्यक्तीच्या मुलासमोर कसे हसत आहेत’, ‘अंत्यसंस्काराच्या वेळी हसण्याची ही वृत्ती पाहून खूप वाईट वाटले’, ‘एखाद्याच्या मरणावर खूप हसू येतंय यांना’, ‘प्रार्थना सभेत हसणे किती अपमानास्पद आणि लाजिरवाणे आहे,’ अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

दरम्यान, अरमान कोहलीचा मित्र विजय ग्रोव्हरने राजकुमार कोहली यांच्या निधनाची माहिती दिली होती. “राजकुमार कोहलींचं निधन झालं. ते सकाळी ८ वाजता आंघोळीसाठी गेले होते, पण बराच वेळ बाहेर न आल्याने अरमानने बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी राजकुमार कोहली आत बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता,” असं विजयने ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं होतं.