सलमान खान (Salman Khan) हा बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. आजही त्याची लोकप्रियता टिकून आहे. अभिनेत्याने ९० च्या दशकापासून आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. त्याच्या काही भूमिकांचे आजही कौतुक होताना दिसते. प्रेक्षकांमध्ये अभिनेत्याच्या अभिनयाचे कौतुक होत असले तरी सलमान खान सेटवर उशिरा पोहोचण्यासाठी ओळखला जायचा. तो शूटिंगसाठी नेहमी उशिरा जात असे. त्याच्या अनेक सहकलाकारांनी याबद्दल अनेकदा वक्तव्य केले आहे. सलमान खान थेट दुपारी जेवणाच्या वेळी शूटिंगसाठी सेटवर यायचा. जेवण करायचा आणि मग तो शूटिंगला सुरुवात करायचा, असे त्याच्या सहकलाकारांनी मुलाखतीत म्हटले आहे. आता दिग्दर्शक निखिल अडवाणींनी सलमान खानबरोबर सलाम-ए-इश्क या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

“तो सकाळी ५ वाजता शूटिंगसाठी येऊ शकत नाही”

निखिल अडवाणींनी ‘माशाबल इंडिया’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत निखिल अडवाणींनी तेनू लेके या गाण्याच्या शूटिंगची आठवण सांगत म्हटले, “आम्ही सलमानला सकाळी ५ वाजता शूटिंगसाठी येण्यास सांगितले. त्यावर त्याने म्हटले की, त्याला रात्रभर जागे राहावे लागेल. आम्ही सलमानला रात्रभर जागे ठेवले. कारण- त्याने आम्हाला सांगितले होते की, तो सकाळी ५ वाजता शूटिंगसाठी येऊ शकत नाही. माझ्याबरोबर रात्रभर जागे राहा. मी सकाळी १० वाजता झोपतो. त्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर बसलो, त्याला शूटसाठी घेऊन गेलो आणि शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर तो झोपला.”

याबरोबरच अर्जुन कपूर या चित्रपटात असिस्टंट म्हणून काम करत होता. त्याने चुकीच्या ठिकाणी कॅमेरा पाठविला होता, अशी आठवणदेखील निखिल अडवाणींनी सांगितली.

गोविंदादेखील सेटवर उशिरा येण्यासाठी ओळखला जातो. मात्र, ‘सलाम-ए-इश्क’वेळी त्याला लोकांना चुकीचे ठरवायचे होते. त्यामुळे तो वेळेत येत असे. त्याने त्याच्या वागण्यात बदल केला होता, अशी आठवण निखिल अडवाणींनी सांगितली.

दरम्यान, या चित्रपटात सलमान खान, गोविंदा यांच्याबरोबरच प्रियांका चोप्रा, जुही चावला, अनिल कपूर हे कलाकारही मुख्य भूमिकांत दिसले होते. निखिल अडवाणींच्या ‘कल हो ना हो’च्या यशानंतर ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपट बनवला गेला. मात्र, या चित्रपटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही.

Story img Loader