गेल्याच महिन्यात ६०० कोटींचं बजेट असलेला बहुचर्चित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. रामायणावर बेतलेल्या या चित्रपटाची वेगळ्याच कारणांमुळे चर्चा झाली. वादग्रस्त संवाद, रामायणाचं विचित्र चित्रण, वाईट व्हीएफएक्स अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांनी चित्रपटाचा प्रचंड विरोध केला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावरही बरीच टीका झाली.
याचदरम्यान रामायणावर बेतलेला आणखी एक चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरू झाली. ‘दंगल’सारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक नितेश तिवारी हे रणबीर कपूर, अलिया भट्टबरोबर रामायण सादर करणार असल्याची बातमी समोर आली होती. अद्याप नितेश यांच्या या आगामी चित्रपटाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी याची चांगलीच चर्चा आहे.
आणखी वाचा : मीना कुमारी यांच्या बायोपिकमध्ये झळकणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; मनीष मल्होत्रा करणार दिग्दर्शनात पदार्पण
नुकतंच नितेश तिवारी यांनी या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. एका मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितेश यांनी याबद्दल उघडपणे भाष्य करायचं टाळलं असलं तरी त्यांच्या वक्तव्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे ‘आदिपुरुष’प्रमाणे त्यांचा चित्रपट लोकांच्या भावना दुखवणार नाही.
‘झूम एंटरटेनमेंट’शी संवाद साधताना नितेश म्हणाले, “मी जेव्हा एखादी कलाकृती बनवतो तेव्हा मी त्याचा पूर्णपणे अभ्यास करतो. ती कलाकृती करताना मी स्वतःच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेतो त्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की मी लोकांच्या भावनांचाही सन्मान करेन.” नितेश तिवारी यांच्या या ‘रामायण’मध्ये केजीएफ स्टार यश हा रावणाची भूमिका करणार असल्याचीही चर्चा होती, पण नंतर खुद्द यशने ही बातमी खोडून काढली.
दिग्दर्शक नितेश तिवारी हे सध्या वरुण धवन, जान्हवी कपूरबरोबरच्या ‘बवाल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या ‘रामायण’बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ‘बवाल’नंतर नितेश या रामायणावर काम सुरू करतील अशी चर्चा आहे.