बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. नितीन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईतील जेजे रुग्णालयात करण्यात आले. मुलं अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावरच देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा – जेजे रुग्णालयात झाले नितीन देसाईंचे शवविच्छेदन, मृत्यूचे कारण आले समोर
नितीन देसाई यांची मुलं अमेरिकेत राहतात, ते भारतात आल्यानंतर देसाई यांना अखेरचा निरोप देण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. तर, नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (४ ऑगस्ट २०२३ रोजी) संध्याकाळी एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. देसाई यांची मुलं अमेरिकेत असतात. ते मुंबईत आल्यानंतर देसाई यांना अखेरचा निरोप देण्यात येईल, अशी माहिती नितीन देसाईंचे जवळचे सहकारी नितीन कुलकर्णी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली. दरम्यान, त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हेही वाचा – नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत मोठी माहिती समोर, खोलीतून पोलिसांना सापडली ऑडिओ रेकॉर्डिंग्स
दरम्यान, नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी अशा दिग्गज बॉलीवूड दिग्दर्शकांसोबत काम केले होते. ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘मंगल पांडे’ यासह अनेक चित्रपटांसाठी त्यांनी भव्य-दिव्य सेट उभारले होते. अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, हेमा मालिनी, मनोज बाजपेयी, रितेश देशमुख यासह इतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत देसाईंच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.
दरम्यान, कर्जबाजारीपणाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. ठराविक मुदतीसाठी घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे नितीन देसाई यांच्या कर्जत चौक येथील एन. डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईचे संकट ओढावले होते. कलिना येथील एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने एन. डी. स्टुडिओ जप्तीसाठी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही केला होता. पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्तीच्या कारवाईला अंतिम मंजूरी दिली गेली नव्हती.