अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. एका भारतीय जोडप्याबरोबर नॉर्वेमध्ये घडलेल्या घटनेवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या दाम्पत्याला आपल्या मुलांची कस्टडी मिळवण्यासाठी नॉर्वे सरकारशी संघर्ष करावा लागला होता. दरम्यान, आज प्रदर्शित झालेला हा चित्रपट काल्पनिक असल्याचं नॉर्वे दूतावासाने म्हटलं आहे.
‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ एका स्थलांतरित भारतीय जोडप्याच्या अनुभवावर आधारित आहे. २०१२ मध्ये त्यांच्या दोन मुलांना संस्कृतीतील भिन्नतेमुळे नॉर्वेजियन फॉस्टर सिस्टमने संशय उपस्थित करत कस्टडी घेतली होती. या कस्टडीविरोधात या दाम्पत्याने कोर्टात लढा दिला होता.
‘सस्ती कॉपी’ म्हणणाऱ्या कंगना रणौतशी बोलणार का? तापसी पन्नू म्हणाली, “जर ती माझ्यासमोर…”
“चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सांस्कृतिक फरकांच्या आधारे मुलांना त्यांच्या कुटुंबापासून कधीही दूर नेलं जाऊ शकत नाही. त्यांना हाताने भरवणे किंवा मुलांनी पालकांसोबत अंथरुणावर झोपणे या गोष्टी मुलांसाठी हानिकारक मानल्या जात नाहीत आणि नॉर्वेमध्ये ते असामान्य नाही,” असं नॉर्वेच्या दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. या चित्रपटातील काही सामान्य तथ्ये योग्यरित्या तपासणे आवश्यक आहे, असंही दूतावासाने नमूद केलंय.
“मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असला तरी त्याची कथा काल्पनिक आहे. यामध्ये ज्या प्रकरणाचा संदर्भ दिला जात आहे तो एक दशकापूर्वी भारतीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि सर्व पक्षांच्या सहमतीने सोडवला गेला होता. शिवाय नॉर्वेचे बाल कल्याण विभाग नफ्यावर चालत नाही. जितकी जास्त मुलं या संगोपन पद्धतीत टाकले जातील, तितके जास्त पैसे विभागाला मिळेल हा कथित दावा पूर्णपणे खोटा आहे. काळजी घेण्याच्या उद्देशाने विभाग काम करतं, ती पैसे कमावणारी संस्था नाही” असं नॉर्वे दूतावासाने त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटलंय.