आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीवर काही कुटुंबांनी बराच काळ अधिराज्य गाजवलं आहे, किंबहुना ते आजही राज्य करत आहेत. बॉलिवूडमधील कपूर घराणं यापैकीच एक. २०२३ मध्येसुद्धा कपूर घराण्यातील बरेच लोक हे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांनी सुरू केलेली परंपरा ते पुढे नेत आहेत. आता राज कपूर यांनी सुरू केलेल्या ‘आरके स्टुडिओ’चं फारसं महत्त्व उरलेलं नसलं तरी या चित्रपटसृष्टीला आकार देण्यात एकूणच कपूर घराण्याचा खूप मोठा हात आहे.
याप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अशाच काही घराण्यांचा दबदबा पाहायला मिळतो. तिथे असलेलं अक्किनेनी कुटुंबाचं वर्चस्व आपल्याला ठाऊक आहेच. पण तुम्हाला ठाऊक आहे की या सगळ्या मोठ्या कुटुंबासमोरही असं एक फिल्मी कुटुंब आहे ज्यांची संपत्ती या सगळ्यांपेक्षा कैक पटीने जास्त आहे. बॉलिवूडमध्ये अगणित असे सुपरहीट चित्रपट देणारी ही जॉइंट फॅमिली सध्या भारतातील सर्वात श्रीमंत अशी फिल्म फॅमिली मानली जाते.
आणखी वाचा : ‘जेलर’ चित्रपटाचं काम पूर्ण करून रजनीकांत जाणार हिमालयात; पुन्हा सुरु करणार आपला आध्यात्मिक प्रवास
चोप्रा आणि जोहर कुटुंब हे सध्या भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब आहे. ‘डीएनए’च्या वृत्तानुसार या दोन्ही कुटुंबाची मिळून एकूण संपत्ती ही ९००० कोटीच्या जवळपास आहे. फाळणीपूर्वीच्या पंजाबमधील विलायती राज चोप्रा हे जेव्हा फाळणीनंतर आपल्या कुटुंबासह मुंबईत आले तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच बी. आर. चोप्रा आणि यश चोप्रा यांनी चित्रपटात नशीब आजमावायचं ठरवलं अन् आज त्यांनी ते करून दाखवलं.
बी.आर चोप्रा व यश चोप्रा यांची बहीण हिरू हिने यश जोहर यांच्याशी लग्न केलं अन् हे दोन्ही परिवार एकत्र आले. आज या दोन्ही कुटुंबाची स्वतंत्र अशी प्रोडक्शन कंपनी आहेत. यश जोहर यांनी सुरू केलेली ‘धर्मा प्रोडक्शन’ आणि यश चोप्रा यांनी सुरू केलेली ‘यश राज फिल्म्स’ ही सद्यस्थितीतील भारतातील सर्वात मोठी प्रोडक्शन हाऊसेस आहेत. ‘धर्मा प्रोडक्शन’ची धुरा करण जोहरच्या खांद्यावर असून त्याने ती लीलया पेलली आहे. तर ‘यश राज फिल्म्स’बरोबरच इतरही तीन स्टुडिओजची जवाबदारी आदित्य चोप्राच्या खांद्यावर आहे.