The Kerala Story controversy : सध्या बॉलिवूड असो किंवा सोशल मीडिया किंवा अगदी नुकताच संपलेला कर्नाटकचा प्रचार. सगळीकडे एकच विषय गाजतो आहे तो ‘द केरल स्टोरी’ या सिनेमाचा. द केरल स्टोरी हा वादग्रस्त आणि प्रपोगंडा सिनेमा आहे असा आरोपही केला जातो आहे. मात्र या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. एवढंच नाही तर बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमा आहेत ज्यांच्या प्रदर्शनाआधी वाद झाला आणि या सिनेमांनी छप्परतोड कमाई केली. ते सिनेमा कोणते आहेत आपण जाणून घेणार आहोत.
द केरल स्टोरी
तामिळनाडूमध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून कशा पद्धतीने त्यांचं धर्मपरिरवर्तन केलं जातं आणि ISIS चं दहशतवादी कसं केलं जातं? असा आशय असलेली कथा या सिनेमात आहे. या सिनेमाने रिलिज झाल्यापासून आजपर्यंत ३७ कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत.
‘पठाण’लाही झाला वादाचा फायदा
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित झाला. मात्र त्याआधी दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून प्रचंड वाद निर्माण झाला होता. एवढंच नाही तर बेशरम रंग या गाण्यावरूनही हा वाद निर्माण झाला होता. शाहरुख खानला बॉयकॉट करा अशी मोहीमही सोशल मीडियावर चालली. तसंच बराच गदारोळही झाल्याचं पाहण्यास मिळालं. मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. पठाण सिनेमाने रिलिज झाल्यानंतर पाच दिवसात २०० कोटींहून अधिक कमाई केली.
काश्मीर फाईल्स
सध्या द केरल स्टोरी हा जो सिनेमा प्रदर्शित झाला आहे त्या सिनेमाची तुलना काश्मीर फाईल्स या सिनेमाशीही होते आहे. द काश्मीर फाईल्स हा दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रीचा सिनेमा होता. या सिनेमावरुनही बराच वाद निर्माण झाला होता. काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून कसं हाकलण्यात आलं, जे राहिले त्यांच्या हत्या कशा करण्यात आल्या? असा सिनेमाचा विषय होता. या सिनेमावरूनही बरीच चर्चा झाली होती. तसंच वाद आणि आरोपही झाले. मात्र सिनेमा रिलिज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कामगिरी केली. या सिनेमाने ३०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.
पद्मावत
दीपिकाच्या पठाणच नाही तर पद्मावत या सिनेमावरूनही वाद झाला होता. करणी सेनेने तर दीपिका पदुकोणचे नाक कापण्याचीही धमकी दिली होती. एवढंच काय तर या सिनेमात राणी पद्मावतीची प्रतिमा मलीन केली जाते असाही आरोप करणीसेनेने केला होता. त्यामुळे घुमर गाण्यातील दृश्यांमध्ये बदल करण्यात आला होता. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या होत्या. या सिनेमाचं नाव पद्मावती असं होतं. जे बदलून पद्मावत करण्यात आलं. मात्र हा सिनेमा रिलिज झाल्यानंतर सिनेमाने ५५० कोटींहून अधिक कमाई केली. दीपिकाच्या पद्मावतच नाही तर रणवीरसोबतच्या रामलीला-गोलियों की रासलीला या सिनेमावरूनही प्रचंड वाद निर्माण झाला होता. तसंच बाजीराव-मस्तानी या सिनेमावरुनही वाद झाला होता. मात्र या सिनेमांनाही चांगलं ओपनिंग मिळालं आणि त्यांनी कमाईही उत्तम केली.
PK वरुन वाद
मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानचा पी. के. हा सिनेमाही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हिंदू देवतांची बदनामी या सिनेमातून करण्यात आली आहे असा आरोप करण्यात आला. पी.के. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३४० कोटींची कमाई केली. या सिनेमात आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंग राजपूत आणि बोम्मन इराणी यांच्या भूमिका होत्या. आमिर खानच्या दंगल या सिनेमाच्या आधी त्याने एक वक्तव्य केलं होतं. त्याने त्याची दुसरी पत्नी किरण रावसोबत झालेली चर्चा एका मुलाखतीत सांगितली होती. देशात असहिष्णुता वाढली आहे त्यामुळे या देशात रहावंसं वाटत नाही असं आमिर खान म्हणाला होता ज्याचा फटका दंगलला बसेल असं वाटलं होतं. मात्र दंगल सिनेमानीही ३५० कोटींहून अधिक कमाई केली होती.