कोविडमुळे चित्रटसृष्टीत झालेला आमूलाग्र बदल आपल्याला ठाऊक आहेच. ओटीटी प्लॅटफॉर्मशी प्रेक्षकांशी ओळख झाल्याने त्यांना चित्रपटगृहाकडे खेचून आणणं सध्या कठीण झालं आहे. दर्जेदार गोष्ट असेल तर प्रेक्षक ती बघायला येतात नाहीतर त्याकडे पाठ फिरवतात अशी उदाहरणं आपण बरीच पाहिली आहेत. खासकरून ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर कमी बजेट असलेल्या पण दर्जेदार कथा असलेल्या चित्रपटांनाच प्रेक्षक जास्त पसंती देत असल्याचं स्पष्ट झालं.
नुकत्याच आलेल्या ‘द केरला स्टोरी’ने तर इतिहासच रचला. अगदी कमी म्हणजेच २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात २३८.८७ कोटींचा व्यवसाय केला. याआधीही अशा बऱ्याच कमी बजेटच्या चित्रपटांनी उत्तम व्यवसाय केला. आमिर खान प्रोडक्शनचा २०१० साली आलेला ‘पिपली लाईव्ह’ या चित्रपटाने ५० कोटींची कमाई केली होती. आयुष्मान खुरानाचा निव्वळ १० कोटींमध्ये बनलेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटाने ५५ कोटींचा व्यवसाय केला होता.
आणखी वाचा : ‘संदेसे आते है’ या गाण्यानंतर जावेद अख्तर यांनी मागितलेली अनु मलिक यांची स्वाक्षरी; नेमका किस्सा जाणून घ्या
इतकंच नव्हे तर आयुष्मान आणि तब्बू यांच्या १७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘अंधाधून’ने जगभरात ४४० कोटींची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली होती. पण तुम्हाला माहितीये का की सगळ्यात कमी बजेटमध्ये बनलेल्या आणि जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट वेगळाच आहे. ‘डीएनए’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने कमाईमध्ये ‘मुघल-ए-आजम’, ‘शोले’पासून ‘दंगल’, ‘केजीफ’, ‘पठाण’लाही मागे टाकलं आहे.
हा चित्रपट म्हणजे आमिर खान प्रोडक्शन या बॅनरखाली बनलेला जायरा वसिमची मुख्य भूमिका असलेला ‘सीक्रेट सुपरस्टार’. १५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ९१२.७५ कोटींचा व्यवसाय केला आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतरही देशात या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात आमिर खाननेही एक छोटी भूमिका निभावली होती.