२०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धात बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा अडकली होती (Nushrratt Bharruccha). अभिनेत्री ‘हायफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्यासाठी तिथे गेली होती. या चित्रपट महोत्सवात नुसरतचा ‘अकेली’ हा चित्रपट दाखवण्यात आला होता. पण त्याच दरम्यान तिथे युद्ध झाले आणि नुसरत तिथेच अडकली होती. यादरम्यान अभिनेत्रीचा संपर्कही तुटला होता.

या युद्धातून नुसरत सुखरूप आपल्या मायदेशी परत यावी म्हणून तिचे अनेक चाहते व कुटुंबीय प्रार्थना करत होते. त्यानंतर भारत सरकारने अनेक प्रयत्न करत नुसरतला मायदेशी सुखरूप आणलं. तेव्हा अडचणीत सापडलेल्या नुसरतने भारत सरकारकडे मदत मागितली होती. यावर भारत सरकारनेही इस्रायल सरकारबरोबर मिळून नुसरतची सुटका केली आणि तिला भारतात आणण्यात आले होते.

याचबद्दल नुसरतने भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ‘न्यूज १८’च्या रायझिंग इंडिया समिट कार्यक्रमात नुसरत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट झाली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नुसरतने त्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने असं म्हटलं आहे की, “CNN-News18 च्या रायझिंग भारत समिटमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आयुष्यात पहिल्यांदाच भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”

यापुढे तिने असं म्हटलं की, “मोदीजी, तुमच्या अटल नेतृत्वाबद्दल आणि अलीकडच्या संघर्षादरम्यान इस्रायलमध्ये अडकलेल्या माझ्यासह भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी तुमच्या सरकारने केलेल्या जलद कृतीबद्दल तुमचे प्रत्यक्ष आभार मानणे भागच आहे. या भेटीबद्दल खूप खूप धन्यवाद. ही माझ्यासाठी आयुष्यभराची आठवण राहील.” नुसरतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या पोस्टखाली नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.

नुसरतने रायझिंग इंडिया समिटमध्ये बोलताना तिच्या इस्त्राइलमधील अनुभवाबद्दल असं म्हटलं की, “ती अशी परिस्थिती होती ज्यासाठी कोणीही तुम्हाला तयार करू शकत नाही. फक्त १२ तासांत मी असहाय्य वाटणे म्हणजे काय हे शिकले. ते माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण तास होते. मला वाटले नव्हते की, मी माझ्या कुटुंबाला किंवा मित्रांना पुन्हा भेटू शकेन. मी खूप त्रासातून जात होते. मला वाटले की बस्स, आता संपले.”