‘हमास’ने इस्रायलवर हल्ला केल्यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. शनिवारी अचानक ‘हमास’ने इस्रायलवर एकाच वेळी पाच हजार रॉकेट सोडून मोठा हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने देखील गाझा पट्टीवर प्रत्युत्तरादाखल अनेक हवाई हल्ले केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने आता गंभीर रुप धारण केलं आहे व एकूणच साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे
अशी भयावह परिस्थिती असताना बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. नुकतीच ती सुखरुप मायदेशी परतली. नुसरत मुंबई विमानतळावर उतरताच पत्रकारांनी तिच्याभोवती कसा गराडा घातला याचे व्हिडीओ आपण पाहिलेच असतील. याबरोबरच या व्हिडीओमध्ये नुसरत चांगलीच अस्वस्थ दिसत होती. तिने मीडियाशी काहीही संवाद साधला नाही. आता नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा : राजकारणात प्रवेश करणार का? अक्षय कुमार उत्तर देताना म्हणाला, “परमेश्वराच्या कृपेने…”
हा व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये नुसरत म्हणते, “सर्वप्रथम मला ज्यांनी मेसेज केले, ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्यांचे मी आभार मानते. मी पुन्हा घरी परतले आहे आणि सुखरूप आहे. दोन दिवसांपूर्वी तेल अविवमधील हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटामुळे मला जाग आली, चहूबाजूने सायरनचे आवाज ऐकू येत होते, बॉम्बहल्ले सुरू होते.”
पुढे नुसरत म्हणाली, “मी आजवर कधीच अशा वातावरणात राहिले नव्हते, आज जेव्हा मी माझ्या घरात सकाळी झोपून उठले तेव्हा मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपण भारतासारख्या सुरक्षित देशात राहतो आहोत, आपण खरंच खूप नशीबवान आहोत. याचसाठी मी आपल्या देशाच्या सरकारचे, भारतीय तसेच इस्रायल दूतावासाचे आभार मानते, त्यांनी योग्य मार्गदर्शन केल्याने मी आज सुखरूप माझ्या देशात परतले. जे लोक युद्धात अजूनही अडकले आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते व लवकरच शांती प्रस्थापित होईल अशी आशा करते.”
आपल्या या पोस्टमध्ये नुसरतने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स या दोन्ही अकाऊंटना टॅग केले आहे. याबरोबरच नुसरतने तिच्या या संपूर्ण अनुभवाबद्दल आणखी एक वेगळी पोस्ट करत तिच्या भावना लेखी स्वरूपातही मांडल्या आहेत.