बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा ‘प्‍यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्‍वीटी’ या चित्रपटांमुळे ओळखली जाते. अभिनयासह नुसरत सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी चाहत्यांसह सोशल मीडियामार्फत शेअर करीत असते. परंतु, सध्या नुसरत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

नुसरतनं नुकतीच ‘शुभंकर मिश्रा’ यांच्या पॉडकास्टमध्ये देव, शक्ती, धर्म, मंदिरं, चर्च याबद्दलचं तिचं मत सांगितलं आहे. नुसरतचा जन्म एका मुस्लीम कुटुंबातील आहे; परंतु असं असलं तरी ती मंदिरांमध्ये व चर्चमध्ये जात असते. नुसरतने याबाबत बोलताना सांगितलं, “मी लहानपणापासून मंदिरात जाते. १६ शुक्रवारचे उपवासही करते. त्यासह मी बऱ्याचदा गुरुद्वारा आणि चर्चमध्येही जात असते”.

त्यानंतर तिला केदारनाथला जाण्याच्या अनुभवाबद्दल विचारलं असता, तिनं सांगितलं की, “माझी केदारनाथ व बद्रीनाथला जाण्याची खूप इ्छा होती. मला तिथे जाऊन नतमस्तक व्हायचं होतं”. त्यासह तिनं वैष्णोदेवीच्या दर्शनाचा अनुभवदेखील शेअर केला आहे. वैष्णोदेवीच्या अनुभवाबद्दल सांगताना ती म्हणाली, “मी वैष्णोदेवीलाही भेट दिली आहे; फक्त प्रार्थना करण्यासाठी नाही, तर त्या मंदिराच्या पायऱ्याही चढले, १३ किलोमीटर चालले, दर्शन पूर्ण केलं आणि परतले. मी कोण काय म्हणेल हा विचार कधीच करीत नाही. मला जे वाटतं, ते मी करते”.

परंतु, यामुळेच नुसरतला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मुस्लीम असतानाही मंदिरात गेल्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. पण, तरीसुद्धा नुसरत कायम प्रत्येक सण-उत्सव साजरा करताना दिसते. याबाबत ती अनेकदा सोशल मीडियावर पोस्टही करीत असते.

दरम्यान, नुसरत अलीकडेच सोहा अली खानसोबत ‘छोरी २’मध्ये दिसली. तिने २००६ मध्ये ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. गेल्या काही वर्षांत, ती ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’, ‘तू झुठी मैं मक्कार’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमधून झळकली होती.