बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. पडद्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका नुसरत साकारू शकते हे तिने फार कमी वेळात सिद्ध केले आहे. आता लवकरच नुसरत तिच्या नव्या चित्रपटातून एका आगळ्या वेगळ्या आणि दमदार अशा भूमिकेत दिसणार आहे. नुकताच नुसरतच्या आगामी ‘अकेली’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
गेले बरेच दिवस नुसरतच्या या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा सुरू होती. आता या चित्रपटाचा प्रदर्शित झालेला टीझर पाहून सगळेच अवाक झाले आहेत. टीझरमध्ये नुसरत आणि चित्रपटातील इतर अभिनेत्री शस्त्रधारी दहशतवाद्यांच्या कचाट्यात सापडल्याचं स्पष्ट होत आहे. चित्रपटातील एकही संवाद किंवा इतर पात्रांची ओळख या टीझरमध्ये करण्यात आलेली नाही.
आणखी वाचा : पत्रकाराला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानातही जाण्यास तयार सेलिना जेटली; ट्वीट करत केला ‘त्या’ प्रकरणाचा खुलासा
एकूणच या चित्रपटाचे कथानक नेमकं काय असेल याबद्दल उत्सुकता कायम आहे. टीझरमध्ये फक्त काही महिलांना बंदुकीचा धाक दाखवून कैद केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रणय मेश्राम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय सुप्रसिद्ध निर्माते नितीन वैद्य यांच्या ‘दशमी पिक्चर’ आणि ‘झी स्टुडिओ’ यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे लोकप्रिय इस्त्रायली वेब सीरिज ‘फौदा’मधील काही मुख्य कलाकार या चित्रपटात आपल्याला दिसणार आहेत. अमीर बौतरुस आणि त्सही हालेवी हे दोन प्रसिद्ध इस्त्रायली अभिनेते ‘अकेली’मध्ये झळकणार आहेत. हे इस्त्रायली कलाकार यात असल्याने चित्रपटाची कथासुद्धा ‘फौदा’च्या जवळपास जाणारी असू शकते ही शक्यता नाकारता येणार नाही.
सध्या टीझरमध्ये फक्त नुसरत आणि इतर महिला पात्रांचीच ओळख करून दिलेली आहे. त्यामुळे हे दोन इस्त्रायली अभिनेते नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत हे आपल्याला ट्रेलर समोर आल्यावर स्पष्ट होईल. ‘फौदा’ या वेब सीरिजचे भारतातही भरपूर चाहते असल्याने प्रेक्षक या वेब सीरिजमधील कलाकारांना भारतीय चित्रपटात पाहण्यास उत्सुक आहेट. ‘अकेली’ हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.