समीर जावळे
Controversy ” विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होतो आहे. मात्र या चित्रपटात संभाजी महाराजांना लेझिम नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये संभाजी महाराज लेझिम नृत्य करताना दिसत आहेत. या दृश्यांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं आहे. पण, यामधल्या नृत्यावर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय चित्रपटातले काही संवाद देखील नेटकऱ्यांना खटकले आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली. त्यावर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता. आता या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का? छावा हा एकच चित्रपट नाही तर असे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक चित्रपट आहेत ज्यावरुन वाद झाला आहे. हे चित्रपट कुठले आहेत जाणून घ्या.
आदिपुरुष
२०२३ मध्ये आदिपुरुष हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा रामायणावर आधारित होता. या चित्रपटात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रावण यांची सगळ्यांची पात्रं आणि त्यांच्या तोंडी असलेले संवाद यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. वाद इतका शिगेला गेला होता की यातून ही वाक्यं, काही दृश्यं वगळावी लागली.
हर हर महादेव
हर हर महादेव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाजीप्रभू देशपांडेच्या आयुष्यावरचा एक चित्रपट दोन वर्षांपूर्वी आला होता. या चित्रपटात सुबोध भावेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती तर शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे ही भूमिका साकारली होती. यातल्या अनेक दृश्यांवरुन वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातला शो बंद पाडला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे अफझलखानाला हिरण्यकश्यपूला नरसिंहाने जसं मांडीवर घेऊन त्याचा कोथळा काढला तसा कोथळा काढताना दाखवण्यात आले आहेत असं दृश्य यात होतं. तसंच अफझल खान आणि छत्रपती शिवराय भेटीच्या वेळी शिवरायांचा जिरेटोप रक्ताने माखलेला दाखवण्यात आला होता या आणि अशा दृश्यांवर आक्षेप घेण्यात आले होते आणि यावरुन जाळपोळही झाली होती.
तानाजी या चित्रपटावरुन झाला होता वाद
अजय देवगण तानाजीच्या भूमिकेत असलेल्या तानाजी या चित्रपटामुळेही वाद निर्माण झाला होता. तानाजी साधूच्या वेषात असतो, आपल्या हातातील दंड छत्रपती शिवाजी महाराजांवर फेकतो असं दृश्य यात दाखवण्यात आलं होतं. या दृश्यावरुन आणि उदेभानाला तानाजीने मारल्याच्या दृश्यावरुन वाद निर्माण झाला होता. ओम राऊतने इतिहास बदलल्याची टीका झाली होती. कारण उदेभानाला तानाजी मालुसरेंनी नाही तर शेलारमामांनी ठार केलं. तसंच सैफ अली खानने रंगवललेला उदेभान हा मगर खाताना दाखवला आहे, त्या दृश्यावरुनही वाद झाला होता.
पद्मावत
पद्मावत या चित्रपटाचं नाव आधी पद्मावती होतं. या चित्रपटातील घुमर या गाण्यावर आणि राणी पद्मावतीचं चित्रण ज्या पद्धतीने करण्यात आलं त्यावर करणी सेनेने आक्षेप घेतला होता. संजय लीला भन्साळीला करणी सेनेने मारहाण केली होती. तसंच दीपिका पादुकोणचं नाक कापण्याची धमकीही देण्यात आली होती. संजय लीला भन्साळींना हा चित्रपट बनवणं महागात पडलं होतं. तसंच अल्लाउद्दीन खिल्जी हे पात्र संजय लीला भन्साळींनी जास्तच अधोरेखित करुन त्याचं महत्त्व वाढवलं असाही आरोप करण्यात आला होता.
बाजीराव मस्तानी
संजय लीला भन्साळी यांच्याच बाजीराव मस्तानी या चित्रपटातील पिंगा आणि मल्हारी या दोन गाण्यांवरुन वाद निर्माण झाला होता. बाजीराव आणि निजाम यांच्यातली एक बैठक यशस्वी होते. त्यानंतर बाजीराव पेशव्यांना मल्हारी गाण्यावर नाच करताना दाखवलं आहे. तसंच मस्तानी आणि काशीबाई बरोबर पिंगा घालत होत्या हे पिंगा गाण्यात दाखवण्यात आलं आहे. या दोन्ही गाण्यांवर बाजीराव पेशव्यांच्या आणि मस्तानीच्या वंशजांनी आक्षेप घेतले होते. तसंच चित्रपट आम्हाला दाखवल्याशिवाय प्रदर्शित करु नये अशी भूमिकाही घेतली होती.
हे राम
हे राम नावाचा एक चित्रपट येऊन गेला. त्याची टॅगलाईनच AN EXPERIMENT WITH TRUTH अशी होती. या चित्रपटात कमल हासन, शाहरुख खान, राणी मुखर्जी, सौरभ शुक्ला, विक्रम गोखले, अतुल कुलकर्णी अशी कलाकारांची फौज होती. या चित्रपटातील कमल हासन आणि वसुंधरा दास यांच्यातली प्रणय दृश्यं आणि कमल हासन आणि राणी मुखर्जी यांचं चुंबन दृश्यं यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. चित्रपटात अनेक बोल्ड प्रसंग होते. भारताची फाळणी झाल्यानंतर एकटा नथुराम गोडसेच गांधी हत्येसाठी पेटून उठला नव्हता तर इतर अनेक संघटना होत्या ज्यांना महात्मा गांधींना ठार करायचं होतं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता.
असोका
शाहरुख खानने असोका नावाचा एक चित्रपट केला होता. यातल्या शाहरुख खानच्या लूकवरुन आणि कौर्वकी नावाच्या नृत्यांगनेसह सम्राट अशोकाने केलेल्या नाचावरुन वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात कौर्वकीची भूमिका करीना कपूरने केली होती. रात का नशा अभी आणि ओ रे कांची.. या दोन गाण्यांवरुन वाद निर्माण झाला होता. तसंच या चित्रपटातली वेशभूषाही वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
मंगल पांडे द रायझिंग
‘मंगल पांडे द रायझिंग’ या केतन मेहतांच्या सिनेमात मंगल पांडे (आमीर खान) आणि गणिकेच्या भूमिकेत असलेली राणी मुखर्जी यांचे प्रेमसंबंध दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटांमधल्या काही प्रसंगांवरुनही वाद निर्माण झाला होता. ब्रिटीश सरकारनं कसा जुलूम केला हे दाखवण्यासाठी राणी मुखर्जी आणि इतर काही अभिनेत्रींवर बलात्काराचे प्रसंगही टाकण्यात आलेले आहे. देशभक्त मंगल पांडे आणि एका गणिकेचे प्रेमसंबंध होते का? यावरुन आणि चित्रपटांतल्या काही दृश्यांवरुन चांगलाच वाद पेटला होता. सिनेमा चालला नाही त्यामुळे वादही नंतर मिटला.