प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याबद्दल अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी १६ जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. तब्बल ५०० कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करणार, याकडे प्रेक्षकांचं व ट्रेड अॅनालिस्टचं लक्ष लागलं होतं. अखेर चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, आदिपुरुष चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल ९५ ते ९८ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने तेलुगू भाषेत सर्वाधिक कमाई केल्याचं म्हटलं जातंय. तेलुगूमध्ये ५८.५ कोटी, हिंदी ३५ कोटी आणि तमिळ ०.७ तर मल्याळम ०.४ कोटी रुपये कमावले असल्याचं त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा – “जाणीवपूर्वक लिहिले”, ‘आदिपुरुष’मध्ये हनुमानाच्या वादग्रस्त संवादावर लेखकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या देशाचे…”
दुसरीकडे, निर्माते आणि चित्रपट व्यवसाय तज्ज्ञ गिरीश जोहर यांनी या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत ट्वीट केलंय. त्यानुसार, हा चित्रपट भारतातील सर्व भाषांमध्ये ४ हजारहून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. “प्रेक्षकांना नवीन आणि सुधारित ट्रेलर आवडला आहे. चित्रपट आमच्या पौराणिक महाकाव्य रामायणवर आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट दमदार ओपनिंग करणार,” असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्यामते सुरुवातीच्या अंदाजांनुसार चित्रपटाने देशात ९८ कोटी व जगभरात तब्बल १५० कोटी रुपयांची पहिल्याच दिवशी कमाई केली.
दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कलाकारांचे लूक्स, व्हीएफएक्स आणि डायलॉगवरून प्रेक्षक संतापले आहेत. त्यामुळे चित्रपट वादातही अडकला आहे. असं असूनही पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली. परिणामी शनिवार व रविवार या दिवसांत चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ होईल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.