अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला सनी देओलच्या ‘गदर २’बरोबर प्रदर्शित झाला, अन् प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला. अनपेक्षितपणे या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली. याबरोबरच चित्रपटाचा विषय हा हस्तमैथुन आणि लैंगिक शिक्षण असल्याने हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडला. याला सेन्सॉरने ‘ए सर्टिफिकेट’ दिलं ज्यामुळे निर्माते चांगलेच निराश झाले होते.
चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनीसुद्धा त्याबद्दल भाष्य केलं. हा चित्रपट किशोरवयीन मुलांनी पाहायलाच पाहिजे असं बऱ्याच लोकांनी मत मांडलं तरी यावर सेन्सॉर बोर्डकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. आता जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, परंतु सेन्सॉरने पास केलेलाच चित्रपट ओटीटीवर दाखवण्यात येणार असल्याने याचे दिग्दर्शक अमित राय चांगलेच नाराज झाले आहेत.
आणखी वाचा : हस्तमैथुनसारख्या विषयामुळे सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेला ‘OMG 2’ आता ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
‘ओह माय गॉड २’ जेव्हा ओटीटीवर येईल तेव्हा सेन्सॉरने जे सीन्स काढायला सांगितले तेदेखील त्यात असतील असं भाष्य मध्यंतरी दिग्दर्शक अमित राय यांनी केलं होतं, परंतु आता नेटफ्लिक्सने सेन्सॉरने पास केलेलाच चित्रपट दाखवणार असल्याचा पवित्रा घेतल्याने अमित राय यांनी त्यांची खंत व्यक्त केली आहे.
हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना अमित राय म्हणाले, “त्यांनी नेमका कोणता विचार केला हे मला ठाऊक नाही, किंवा आमचं सीबीएफशी नेमकं के बोलणं झालं होतं तेदेखील त्यांना ठाऊक नाही. सेन्सॉरने पास केलेलाच चित्रपट ते दाखवणार आहेत असं ओटीटी प्लॅटफॉर्मने सांगितलं आहे. आता यावर आपण काय करू शकतो. साऱ्या देशाने ही गोष्ट ओरडून सांगितली तरीही सेन्सॉर बोर्डाला ऐकू येत नसेल त्याला आपण तरी काय करणार?”
‘गदर २’ व ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा उल्लेख करत अमित राय यांनी सेन्सॉर बोर्डाच्या ढोंगीपणावर भाष्य केलं. ते म्हणाले, “आमच्या चित्रपटात एका सीनमध्ये ट्रकच्या मागे दाखवलेली कंडोमची जाहिरात हटवायला लावली, पण जेव्हा मी ‘गदर २’ चित्रपटगृहात पाहायला गेलो तेव्हा चित्रपट सुरू होण्याआधी कंडोमची कार्तिक आर्यनची जाहिरात दाखवली गेली होती ते चालतं का? ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये एवढे किसिंग सीन्स आहेत, ते लहान मुलांसाठी योग्य आहेत का?”