बॉलीवूड स्टार वरुण धवन सध्या त्याच्या फादर्स ड्युटीमध्ये व्यग्र आहे. आज १६ जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जातोय. अशातच नुकताच बाबा झालेला वरुण आज पहिल्यांदाच फादर्स डे साजरा करतोय. यासाठी अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
वरुणने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये वरुणच्या गोंडस मुलीने त्याचं बोट पकडलंय असं दिसतंय आणि दुसऱ्या फोटोमध्ये त्याने त्याच्या श्वानाचा हात हातात धरल्याचं दिसतंय. “पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! माझ्या वडिलांनी मला शिकवले की, हा दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काम करणे आणि मी तेच करत आहे. या जगात मुलीचा बाबा होण्यापेक्षा जास्त आनंद नाही”, अशी सुंदर कॅप्शन वरुणने या फोटोंना दिली आहे.
वरुणच्या या फोटोवर चाहत्यांबरोबरच कलाकारांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. परिणीतीने कमेंट करत लिहिलं, “मुलीचा बाबा, वरुण मोठा झालास रे तू”, मनीष पॉलने “बेस्ट बेस्ट बेस्ट!!! मुली हे वरदान असतात” अशी कमेंट केली. तर जान्हवी कपूरने हार्टचे इमोजी शेअर करत कमेंट केली.
हेही वाचा… …म्हणून सोनाक्षी सिन्हाबरोबर झाला होता ब्रेकअप? अर्जुन कपूरने केला खुलासा; म्हणाला, “काही नाती…”
वरुणची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. तसंच आज फादर्स डेच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांच्या वडिलांबरोबरचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
३ जून २०२४ रोजी वरुण-नताशाच्या आयुष्यात चिमुकल्या मुलीचं आगमन झालं. त्याची गोड बातमी पहिल्यांदा बाळाचे आजोबा डेव्हिड धवन यांनी दिली. रुग्णालयातून बाहेर पडताना डेव्हिड धवन यांनी पापाराझींना सांगितलं की, वरुण आणि नताशाला गोंडस मुलगी झाली आहे.
वरुण धवननं गुड न्यूज दिल्यानंतर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. लेकीच्या आगमनानंतर इन्स्टाग्रामवर ग्राफिक व्हिडीओ शेअर करत वरुणनं लिहिलं होतं, “आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि बाळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद! हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।”
दरम्यान, वरुण आणि नताशा यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या कपलने फेब्रुवारीमध्ये एक खास फोटो शेअर करत नताशाच्या प्रग्नेन्सीची गुड न्यूज चाहत्यांना दिली.