प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या प्रोडक्शन हाऊसला ४५ वर्षं पूर्ण होणार आहेत. या मोठ्या कालखंडात विधू विनोद चोप्रा यांनी कित्येक दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केले तसेच कित्येक बड्या चित्रपटांची निर्मितीही केली. आज सिनेसृष्टीत त्यांचं नाव अदबीने घेतलं जातं. ४५ वर्षं पूर्ण होत असल्याचं औचित्य साधत त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी खास घोषणा केली आहे.
विधू विनोद चोप्रा यांचे दोन सर्वात गाजलेले आणि सर्वाधिक पसंत केलेले दोन चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. ते दोन चित्रपट म्हणजे आमिर खानचा ‘३ इडियट्स’ आणि अनिल कपूर जॅकी श्रॉफचा ‘परींदा’. हे दोन्ही चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याची खुशखबर विधू यांनी दिली. याबरोबरच विधू विनोद यांचे ‘सजा-ए- मौत’ आणि ‘खामोश’ हे दोन्ही चित्रपटही यानिमित्ताने प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत.
आणखी वाचा : तब्बल ९ वर्षांनी अरिजित सिंह व सलमान खानमध्ये पॅच-अप? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
नुकतंच ‘विनोद चोप्रा फिल्म्स’च्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या दिवसात वर नमूद केलेले चित्रपट पुन्हा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. २००९ च्या ‘३ इडियट्स’ने तर बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता तर ‘परींदा’ या चित्रपटातून विधू विनोद चोप्रा यांना खरी ओळख मिळाली.
याबरोबरच विधू विनोद चोप्रा यांचे ‘मिशन काश्मीर’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘पीके’ हे चित्रपटही चांगलेच गाजले. आता विधू विनोद यांचा ‘१२ वी फेल’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटात विक्रांत मेसी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.