अनुपम खेर बॉलिवूडमधील एक जेष्ठ अभिनेते आहेत. आजवर त्यांनी ५०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. एनएसडीसारख्या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या अनुपम हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून लोकांच्या समोर येत आहेत.
ते आता लवकरच शिव राजकुमारचा ‘घोस्ट’ आणि रवी तेजाच्या ‘टायगर नागेश्वर राव’मध्ये झळकणार आहेत. या दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अनुपम खेर स्वतःचा दबदबा निर्माण करत आहेत. नुकतंच ‘ई-टाइम्स’शी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एका वेगळ्याच प्रसंगाबद्दल खुलासा केला जेव्हा त्यांना एक रात्र तरुंगात घालवावी लागली.
आणखी वाचा : “माझं काम कपडे उतरवण्याचं…” मास्क मॅन राज कुंद्राचा खास स्टँड-अप कॉमेडी करतानाचा व्हिडीओ व्हायरल
त्या घटनेबद्दल अनुपम खेर सांगतात, “मी स्ट्रगलच्या दिवसांत इंडस्ट्रीमध्ये माझी व्हीएचएस (व्हिडीओ कॅसेट) दाखवून काम मागायचो, असाच एके रात्री मी माझी व्हीएचएस परत घेण्यासाठी वांद्रे येथे पोहोचलो अन् मी तिथला रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जेव्हा पुढे आलो तेव्हा एका व्यक्तीने मला हात पुढे केला अन् त्याचा आधार घेऊन मी वर प्लॅटफॉर्मवर आलो. परंतु त्या व्यक्तीने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. नंतर मला ध्यानात आलं की ती व्यक्ती कुणी सामान्य व्यक्ती नसून पोलिस अधिकारी होती.”
पुढे ते म्हणाले, “त्यावेळी ते अशाच रेल्वे ट्रॅक पार करणाऱ्या लोकांना पकडत होते ज्यात मी सापडलो. ते नंतर मला पोलिस लॉक-अपमध्ये घेऊन गेले, जिथे आधीच ५० लोकांना पकडण्यात आलं होतं अन् त्यांचे हात दोरीने बांधण्यात आले होते. या कारणामुळेच एक संपूर्ण रात्र मी त्या तुरुंगात काढली. ही गोष्ट अगदी खरी आहे अन् याचा कुठेही रेकॉर्ड किंवा पुरावा नाही.”