Why Vikrant Massey Quit TV: बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीने अभिनयातून निवृत्ती घेत असल्याची पोस्ट केली आहे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्याने अचानक एवढा मोठा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका करून बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या विक्रांत मॅसीचा प्रवास खूप संघर्षमय होता.
विक्रांतने ‘धरम वीर’, ‘बालिका वधू’, ‘कुबूल है’ आणि ‘बाबा ऐसा वर ढुंढो’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. मालिकांमध्ये काम करत असताना विक्रांत महिन्याला लाखो रुपये काम कमवायचा; तरीही त्याने टीव्ही सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागचं कारण त्याने सांगितलं होतं. विक्रांत ‘मिर्झापूर’ वेब सीरिज, ’12th फेल’, ‘मुंबईकर’, ‘हसीन दिलरुबा’ अशा चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ काही दिवसांआधी १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला.
‘अनफिल्टर्ड बाय समदिश’ या यूट्यूब पॉडकास्टमध्ये विक्रांतने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने सांगितलं की एक वेळ अशी होती की विक्रांत महिन्याला जवळपास ३५ लाख रुपये कमवायचा, पण मग त्याने टीव्हीवरील काम सोडून चित्रपटांमध्ये येण्याचे ठरवले. यादरम्यान त्याला आलेल्या अनुभवांबद्दल विक्रांतने या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं.
हेही वाचा – “मागील काही वर्षे खूपच…”, अभिनेता विक्रांत मॅसीने केली निवृत्तीची घोषणा
पहिलं घर टीव्हीच्या कमाईतून घेतलं – विक्रांत
“मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून चांगलीच कमाई केली. मी माझं पहिलं घर याच कमाईतून घेतलं. परंतु एकूणच टेलिव्हिजनवरील त्याच रटाळ आणि बुरसटलेल्या विचारांच्या मालिकांना कंटाळून मी चित्रपटक्षेत्रात यायचा निर्णय घेतला. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो असलो तरी मला शांत झोप लागत नव्हती, मी फार अस्वस्थ होतो. त्याचवेळी मी टीव्ही सोडण्याचा निर्णय घेतला,” असं विक्रांत म्हणाला होता.
हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक
विक्रांतच्या निर्णयाबद्दल घरच्यांची प्रतिक्रिया
“मी चित्रपटात नशीब आजमावणार असल्याचं घरी सांगितलं, माझ्या कुटुंबाला धक्का बसला. कारण मी त्यावेळी चांगले पैसे कमवत होतो. महिन्याला तब्बल ३५ लाख रुपये मला टीव्हीवर काम करून मिळायचे. इतके पैसे मिळत असताना मी टीव्ही सोडून सिनेमे करायचं ठरवलं. पुढील वर्षभरात माझ्याजवळची सगळी बचत संपली. माझी पत्नी शीतल त्यावेळी माझी गर्लफ्रेंड होती, मी तिच्याकडून तेव्हा पैसे घ्यायचो आणि ऑडिशनला जायचो,” असं विक्रांत म्हणाला होता.