गायिका नेहा कक्कर(Neha Kakkar) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या गाण्यांमुळे नाही तर तिच्या मेलबर्नमधील कॉन्सर्टमुळे मोठ्या चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी नेहा कक्करचा मेलबर्नमध्ये एक कॉन्सर्ट आयोजित केला होता. या कॉन्सर्टला ती उशिरा पोहोचली, त्यामुळे तिला स्टेजवरच रडू कोसळले होते. मात्र, तिच्या उशिरा येण्याने उपस्थित प्रेक्षकही तिच्यावर चांगलेच भडकले होते. नेहा जेव्हा स्टेजवर आली, तेव्हा भडकलेल्या चाहत्यांनी तिला परत जाण्यास सांगितलं. त्यानंतर तिला रडू कोसळलं. तिने माफी मागितली, मात्र प्रेक्षकांनी तिला परतण्यास सांगितले.
नेहा कक्करने त्यानंतर एक पोस्ट शेअर करीत मेलबर्नमधील कॉन्सर्टला तिला उशीर का झाला याबद्दल लिहिले होते. तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, मी तीन तास उशिरा गेले, पण माझ्याबरोबर कोणत्या गोष्टी घडल्या याबद्दल मला कोणीही विचारलं नाही. आयोजक माझे आणि इतरांचे पैसे घेऊन पळून गेले. माझ्या बँडला जेवण, हॉटेल आणि पाणीही दिले गेले नाही. ध्वनी तपासणीसाठी पैसे दिले न गेल्याने आम्हाला त्यासाठी उशीर झाला. आम्हाला हेदेखील माहीत नव्हते की कॉन्सर्ट सुरू आहे की नाही, कारण आयोजकांनी माझ्या व्यवस्थापकाचे फोन उचलणे बंद केले होते, असे म्हणत नेहा कक्करने आयोजकांमुळे तिला त्रास झाल्याचे म्हटले होते. तसेच त्यांची गैरसोय केल्याचेही तिने म्हटले होते.
नेहा कक्करच्या आरोपांवर आयोजकांचे प्रत्युत्तर
आता नेहा कक्करने आयोजकांवर केलेल्या या आरोपानंतर आयोजकांनी त्यांची बाजू मांडली आहे. नेहा कक्करने लावलेले हे आरोप खोटे असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. याबरोबरच नेहा कक्करच्या या कॉन्सर्टमुळे मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बिट्स प्रॉडक्शन या कंपनीने नेहाचा कॉन्सर्ट आयोजित केला होता. या कंपनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करीत नेहाचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच नेहा व तिच्या टीमची संपूर्ण व्यवस्था केली होती, असे म्हणत त्यांनी हॉटेलच्या बिलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नेहाच्या कॉन्सर्टमुळे त्यांना ४.५२ कोटींचं नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले. बिटस प्रॉडक्शनने शेअर केलेल्या काही व्हिडीओमध्ये नेहा तिच्या चाहत्यांना भेटत असल्याचे दिसत आहे. याबरोबरच, तिच्यासाठीच्या गाड्यादेखील दिसत आहेत. शेअर केलेल्या स्क्रीनशॉट फोटोमध्ये असेही लिहिलेले दिसत आहे की, नेहा व तिच्या टीमने आर्टिस्ट रूममध्ये धूम्रपान केले. असे धूम्रपान करण्यास सिडनीमध्ये बंदी आहे. तसेच सिडनी, मेलबर्न व पथ क्राऊन टॉवर्सने तिच्यावर बंदी घातल्याचे म्हटले आहे.
आता नेहा कक्कर यावर काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.