Manoj Kumar Passes Away: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनोज कुमार आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, आज मनोज कुमार यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे बॉलीवूडमध्ये शोककला पसरली आहे. मनोज कुमार यांना आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. याबद्दल जाणून घेऊयात…
९ ऑक्टोबर १९५६ साली हिरो बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन वयाच्या १९व्या वर्षी मनोज कुमार यांनी दिल्लीहून मुंबई गाठली. १९५७ मध्ये पहिल्या चित्रपटात १९ वर्षांच्या मनोज कुमार यांनी एका ८०-९० वर्षांच्या भिकारीची छोटीशी भूमिका केली. सुरुवातीला हरिकिशन गोस्वामी असं मनोज यांचं नाव होतं, जे नंतर बदललं गेलं. बॉलीवूडमधील मोलाच्या योगदानासाठी मनोज कुमार यांना पद्मश्रीपासून ते दादासाहेब फाळकेपर्यंत पुरस्कारापर्यंत गौरविण्यात आलं.
मनोज कुमार यांच्या ‘उपकार’ चित्रपटाला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. १९६७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज कुमार, आशा पारेख आणि प्रेम चोप्रा मुख्य भूमिकेत झळकले होते. ‘उपकार’ या चित्रपटाने भारतात ३.४० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर १९९२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री हा पुरस्कार मनोज कुमार यांना भारतीय सिनेसृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला होता. तसंच २०१५मध्ये मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला.
फिल्मफेअर पुरस्कारांची यादी
१९६८ – सर्वोत्कृष्ट चित्रपट – उपकार
१९६८ – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – उपकार
१९६८ – सर्वोत्कृष्ट कथा – उपकार
१९६८ – सर्वोत्कृष्ट संवाद – उपकार
१९६९ – सर्वोत्कृष्ट अभिनेता – बी-इमान
१९७२ – सर्वोत्तम संपादन – शोर
१९७२ – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – रोटी कपडा और मकान
१९९९ – जीवनगौरव पुरस्कार सन्मानित
इतर काही पुरस्कार
२००७: सरदार पटेल जीवनगौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार
२००८: स्टार स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार
२०१०: १२व्या मुंबई चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार
२०१२: अप्सरा फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार
२०१२: नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार
२०१२: न्यू जर्सी, युनायटेड स्टेट्स येथे भारत गौरव पुरस्कार
२०१३: जागरण चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार
२०१९: बीएफजेए (बॉलीवूड फिल्म जर्नलिस्ट अवॉर्ड्स) मध्ये पॉवर ब्रँड्सकडून जीवनगौरव पुरस्कार
२०२०: कलैमामणि पुरस्कार