Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने कठोर निर्णय घेत भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच सीमा हैदर भारच्या भारतात राहण्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सीमा हैदरला भारतातून हाकलून देऊ नये, राखी सावंतची मागणी

सीमा ही पाकिस्तानी महिला २०२३ मध्ये बेकायदेशीरपणे भारतात आली होती आणि तिने ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथील सचिन मीनाशी लग्न केले होते. नुकतेच ते एका मुलाचे पालकही झाले आहेत. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयानंतर सीमा भारतात राहणार की पाकिस्तानात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंतने सीमाबद्दल भाष्य केलं आहे आणि तिला भारतातून हाकलून देऊ नये अशी विनंतीवजा मागणी केली आहे. याबद्दल राखीने तिच्या सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ शेअर केला आहे.

“सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नये, कारण ती भारताचीच सून”

या व्हिडीओमध्ये राखीने असं म्हटलं आहे की, “सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नये कारण आता ती भारताची सून आहे, ती सचिनची पत्नी आहे आणि त्याच्या मुलाची आई आहे. भारताने सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नये. तिचं सचिनवर प्रेम आहे आणि ती भारतीय झाली आहे. ती सचिनच्या मुलाची आई झाली आहे. कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ नये. जर ती आई झाली नसती, तर कदाचित तुम्ही तिला पाठवू शकला असता. पण आता ती भारताची सून आहे, म्हणून तुम्ही सीमा हैदरबरोबर असे चुकीचे कृत्य करू शकत नाही.”

“सचिनशी लग्न करून तिने मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मांतर केले आहे”

यापुढे ती म्हणाली की, “तुम्ही तिच्याशी वाईट वागू शकत नाही. महिलांचा आदर करा. ती सचिनची पत्नी आणि भारताची सून आहे, उत्तर प्रदेशची सून आहे, म्हणून तिला भारतातून हाकलून लावू नये. तिला पाकिस्तानात पाठवू नये. तुम्ही लोक समजून घ्या. अन्याय करू नका. या सर्व गोष्टींचा कट कोण रचत आहे? हे आम्हाला माहित नाही, हे फक्त देवालाच माहिती आहे. ती पाकिस्तानी आहे हे मी मान्य करते; पण ती आता भारताची सून आहे आणि सचिनशी लग्न करून तिने मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मांतर केले आहे.”

“मी विनंती करेन की, सीमा हैदरला भारतातून हाकलून लावू नये”

यापुढे राखी म्हणाली की, “यामुळे निष्पापांचे नुकसान होऊ नये. ती भारतासाठी घोषणा देते आणि तिला एक मूलदेखील आहे. सीमा हैदर ही एक महिला आहे; फुटबॉल नाही की, तुम्ही तिला या देशातून त्या देशात, त्या देशातून या देशात, असे करून हाकलून लावू शकता. म्हणून, मी विनंती करेन की, सीमा हैदरला भारतातून हाकलून लावू नये.” दरम्यान, राखीच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.