२००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘कभी अलविदा ना कहना’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. देवच्या भूमिकेतील शाहरुख आणि मायाच्या भूमिकेतील राणी मुखर्जी चाहत्यांना आजही आठवतात. या चित्रपटाला इतकी लोकप्रियता मिळाली होती की, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ११३ कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र, इतक्या वर्षांनंतर आता या चित्रपटाची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटातील शाहरुखच्या भूमिकेबद्दल एका पाकिस्तानी अभिनेत्याने मोठा दावा केला आहे.

अभिनेते तौकिर नासिर यांनी जबरदस्त विथ वासी शाह या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटाबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणतात, “शाहरुख खानने ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटात जी भूमिका साकारली आहे, ती भूमिका मी परवाज या पाकिस्तानी मालिकेत साकारलेल्या भूमिकेची नक्कल आहे. इतकेच नाही, तर या चित्रपटात शाहरुखचा दाखवलेला लंगडा पाय ही संकल्पनादेखील त्याच मालिकेतून घेतली आहे. या मालिकेत माझा उजवा पाय लंगडा दाखवला आहे आणि त्या चित्रपटातदेखील तसेच दाखवले आहे. हा चित्रपट ‘परवाज’ मालिकेच्या कथेवर आधारित बनवला गेला आहे.” ते पुढे म्हणतात की, शाहरुख त्यांच्या अभिनयाचे, कामाचे अनेकदा कौतुक करतो. माझ्याबरोबरच इतर लोकांनादेखील शुभेच्छा पाठवीत असतो. शाहरुख हा हुशार अभिनेता आहे; पण त्याच्याकडून कामाचे श्रेय मिळायला हवे होते, असे तौकिर नासिर यांनी म्हटले आहे. करण जोहरनेदेखील त्यांना आणि या कथेचे लेखक मुस्तांसर हुसैन यांना चित्रपट बनविल्यानंतर श्रेय दिले नसल्याचे म्हणत ‘परवाज’ मालिकेची कथा मुस्तांसर हुसैन यांनी लिहिली असून, ‘कभी अलविदा ना कहना’ हा चित्रपट त्यावर आधारित बनविला गेला असल्याचा दावा तौकिर नासिर यांनी केला आहे.

२००६ मध्ये करण जोहर दिग्दर्शित ‘कभी अलविदा ना कहना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. देवच्या भूमिकेत शाहरुख खान आणि मायाच्या भूमिकेत राणी मुखर्जी दिसली दिसली होती. दोघांचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न झाले असून, ते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्याशिवाय अभिषेक बच्चन, प्रीती झिंटा, किरण खेर, अमिताभ बच्चन हे दिग्गज कलाकारही आपल्या अभिनयाची झलक दाखविताना दिसले होते. त्याशिवाय चित्रपटातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले होते.