बॉयकॉट ट्रेंडदरम्यान ‘पठाण’ प्रदर्शित झाल्याने चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय चित्रपटाला बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारही पाठिंबा देत आहेत. अशातच शाहरुखला व ‘पठाण’ला सीमेपलीकडून म्हणजेच पाकिस्तानातून पाठिंबा मिळत आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि नादिया अफगाण यांनी शाहरुख खानसाठी पोस्ट शेअर केल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने शाहरुख खानबरोबरचा फोटो शेअर करून ‘पठाण’ला आपला पाठिंबा दर्शवला आहे. माहिराने शाहरुखबरोबर ‘रईस’मध्ये एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. ‘रईस’ चित्रपटाच्या रिलीजला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच माहिराने त्या चित्रपटातील शाहरुखबरोबरचा एक फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे आणि ‘माझा पठाण’ असं कॅप्शन त्या फोटोला दिलं आहे.
माहिरा खानशिवाय पाकिस्तानी अभिनेत्री नादिया अफगाण हिनेही ‘पठाण’बद्दल पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर ‘Ask me Anything’ सेशन ठेवले होते. यात तिचा चाहत्यांनी ‘पठाण’ चित्रपट कधी पाहणार आहे? असं विचारलं होतं. त्यावर “हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झालेला नाही, त्यामुळे तो इतर प्लॅटफॉर्मवर येण्याची मी वाट पाहत आहे,” असं उत्तर नादियाने दिलं.
शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाबाबत जगभरातील चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्सबाहेर गर्दी करत आहेत. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनीही शाहरुख खानबरोबर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, सलमान खानने देखील चित्रपटात कॅमिओ केला आहे.