अक्षय कुमार हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘हेरा फेरी ३’मधून बाहेर पडल्याच्या वृत्तामुळे आणि यावर्षी बरेच चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरल्याने त्याला सोशल मीडियावर सध्या चांगलंच ट्रोल केलं जात आहे. नुकतंच अक्षयने सौदीमध्ये आयोजित केलेल्या ‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली. या सोहळ्यात त्याने लैंगिक शिक्षणावर चित्रपट काढणार असल्याची घोषणाही केली.
या सोहळ्यात एका पाकिस्तानी माणसाने अक्षयच्या ‘बेट बॉटम’ या चित्रपटावर आक्षेप घेतला आणि त्याची नाराजी व्यक्त केली. अक्षयचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट भारतीय हेरगिरी विश्वावर भाष्य करणारा होता. या चित्रपटात पाकिस्तानचं केलेलं चित्रण योग्य नसल्याचा या माणसाने दावा केला.
आणखी वाचा : “लहानपणापासून मला…” सनी लिओनीने सांगितलं ‘Splitsvilla’च्या सूत्रसंचालनासाठी होकार देण्यामागचं कारण
या सोहळ्यात अक्षयशी संवाद साधताना तो माणूस म्हणाला, “मी तुमच्या शेजारील राष्ट्रातून म्हणजेच पाकिस्तानमधून आलोय. तुम्ही ‘टॉयलेट’ आणि ‘पॅडमॅन’सारखे उत्तम चित्रपट केले आहेत. शिवाय भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधसुद्धा फारसे चांगले नाहीत. तुमच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटात दाखवलेल्या काही गोष्ट पाकिस्तानच्या विरुद्ध होत्या ज्या मला खटकल्या.”
या गोष्टीला अक्षयने शांतपणे उत्तर दिलं आहे. अक्षय म्हणाला, “सर हा फक्त चित्रपट आहे, त्याच्याकडे एवढं गांभीर्याने बघू नका, तो फक्त एक चित्रपट आहे.” अक्षयच्या ‘बेल बॉटम’चं दिग्दर्शन रणजीत तिवारी यांनी केलं आहे. यामध्ये अक्षयने एका गुप्तहेराची भूमिका निभावली आहे. अक्षय कुमार आता ‘सेल्फी’, ‘गोरखा’ आणि ‘ओह माय गॉड’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.