बॉलिवूड, दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे सध्या चर्चा आहे ती पाकिस्तानी चित्रपट ‘द लिजंड ऑफ मौला जट’ या चित्रपटाची. या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. यातील पाकिस्तानी अभिनेता हमजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाकिस्तानमधील एका आघाडीचा अभिनेता म्हणून त्याच्याकडे बघितले जात आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने एका मुलाखतीती बॉलिवूडमधील चित्रपटांच्याबाबतीत आपले मत व्यक्त केले होते. बॉलिवूडमधील दोन चित्रपटांसाठी त्याला विचारण्यात आले होते. यातील पहिला चित्रपट म्हणजे वरुण धवनचा ‘जुडवा २’, मूळ ‘जुडवा’ चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटाला हमजा अलीने नकार दिला कारण त्यावेळी भारत पाकिस्तान संबंध बिघडले होते. तर दुसरा चित्रपट म्हणजे अक्षय कुमारचा ‘बेबी’, हा चित्रपट नाकारण्यामागे हमजा अलीने सांगितले की हा चित्रपट पाकिस्तान विरोधी असल्याने मी चित्रपट केला नाही. हमजा अलीने नकार दिल्यानंतर मिकाल जुल्फीकार या पाकिस्तानी अभिनेत्याने भूमिका साकारली होती.
२०१७ साली ‘जुडवा २’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस, तापसी पन्नू हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. वरुण धवनच्या वडिलांनी म्हणजे डेव्हिड धवन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर ‘बेबी’ हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. गुप्तहेरांवर आधारित या चित्रपटाची कथा बेतली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, अनुपम खेर, राणा दुगूबुत्ती हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.