‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शकासह प्रमुख कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. या ट्रेलर लॉंचदरम्यान चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती.
या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री व निर्माती पल्लवी जोशी हिने नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. नुकतंच नसीरुद्दीन यांनी ‘गदर २’ व ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट हे समाजासाठी चिंताजनक आहेत असं वक्तव्य ज्यामुळे हा वाद पुन्हा निर्माण झाला. नसीरुद्दीन यांच्या या वक्तव्यामुळे आपण दुखावले गेलो असल्याचं पल्लवी जोशी हिने स्पष्ट केलं.
आणखी वाचा : “माझ्या चार थोबाडीत मारा पण…” नाना पाटेकरांसह काम करण्याच्या अनुभवाबद्दल विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया
पल्लवी म्हणाली, “त्यांनी दोन्ही चित्रपट पाहिलेले नाहीत, जेव्हा ते हे दोन्ही चित्रपट पाहतील तेव्हा कदाचित त्यांचा याबद्दलचा दृष्टीकोन बदलेल. मी त्यांचा आदर करते पण त्यांच्या या वक्तव्यामुळे मी नक्कीच दुखावले आहे.” असं पल्लवीने सांगितलं. पल्लवीचे पती व दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “काही लोक आयुष्यात प्रचंड वैतागलेले आहेत. ते नेहमीच नकारात्मक गोष्टींवरच विश्वास ठेवतात.”
नसीरुद्दीन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘गदर २’, ‘द केरला स्टोरी’ व ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. नसीरुद्दीन यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द ताशकंत फाइल्स’ या चित्रपटात कामही केलं आहे व अचानक त्यांनी घेतलेला हा पवित्रा बऱ्याच लोकांच्या पचनी पडत नसल्याचं समोर आलं आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.