‘पंचायत २’ फेम अभिनेत्री आंचल तिवारी हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची खोटी बातमी काल (२७ फेब्रुवारी) समोर आली आहे. २५ फेब्रुवारीला बिहारमधील कैमूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये आंचलसह ९ जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात होतं. पण आता अभिनेत्री आंचल तिवारी जिवंत असल्याचं समोर आलं आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत मृत्यूचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं.
“खोटं बोलणं बंद करा,” असं कॅप्शन देत अभिनेत्री आंचल तिवारीने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आंचल म्हणतेय, “नमस्कार, माझं नाव आंचल तिवारी आहे. काल तुम्ही बातम्या ऐकल्या असतील की, ‘पंचायत २’च्या आंचल तिवारीचं मृत्यू झाला आहे. तर ती आंचल तिवारी दुसरी आहे. ती भोजपुरी अभिनेत्री आहे. ‘पंचायत २’ची आंचल तिवारी तुमच्या समोर असून सुरक्षित आहे.”
हेही वाचा – अनन्या पांडे मावशी होणार, लवकरच अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार!
पुढे अभिनेत्री म्हणाली, “माझ्यासंदर्भात आलेली बातमी खोटी आहे. मी सर्व वृत्तवाहिन्यांना हे सांगू इच्छिते की, तुम्ही ज्या बातम्या करत आहात, त्याआधी त्याची पडताळणी केली पाहिजे. सर्वप्रथम, माझं भोजपुरी सिनेसृष्टीही काहीही संबंध नाहीये. मी हिंदी सिनेमा करते, हिंदी रंगमंच करत होती. त्यामुळे माझा भोजपुरीशी काहीही संबंध लावू नका. तुम्ही ज्या काही खोट्या बातम्या पसरवल्या आहेत, त्यामुळे माझ्या कुटुंबियांना, मित्रांना मानसिक त्रास झाला आहे. कृपया या बातम्या जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हटवा. लोक माझी पूनम पांडेशी तुलना करत आहेत. मी पब्लिसिटी स्टंट केल्याचं म्हणत आहे. पण मी काहीच केलं नसून माध्यमांनी केलं आहे. कृपया जितक्या लवकर होईल तितक्या लवकर या बातम्या हटवा.”
हेही वाचा – “आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श उदाहरण…”, सलील कुलकर्णींनी केलेल्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक
दरम्यान, बिहारमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला होता. एक्स पोस्ट शेअर करत त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त करत जखमींवर वेळीच उपचार करण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाला दिल्या होत्या.