‘मेट्रो इन दिनों’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘क्रिमिनल जस्टीस’,’गुँजन सक्सेना’, ‘लुडो’, ‘लुका छुपी’, ‘मिमी’ या आणि अशा अनेक चित्रपटांतून स्वत:च्या अभिनयाची छाप सोडणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे पंकज त्रिपाठी(Pankaj Tripathi) होय. सहज अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. नुकतेच अभिनेते ‘स्त्री २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता लोकसत्ता लोकांकिकामध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेत असताना दशावतार ही महाराष्ट्रातील लोककला शिकण्याची संधी मिळाली होती, याबद्दल वक्तव्य केले आहे.

पंकज त्रिपाठी काय म्हणाले?

पंकज त्रिपाठी यांनी नुकतीच लोकसत्ता लोकांकिकेमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील अनुभवांविषयी प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना पंकज त्रिपाठी यांनी म्हटले, “एनएसडीची ट्रेनिंग उत्तम होती. मीसुद्धा पटणामध्ये तुमच्यासारखाच थिएटर करत होतो. गंभीर सीनमध्येसुद्धा मी कॉमेडी करायचो. कारण प्रेक्षक हसले तर काहीतरी केल्यासारखे वाटायचे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेल्यानंतर समजलं की हे लोक इतकं शिकवणार आहेत. खूप पुस्तके होती. सगळ्यात पहिला क्लास हा सुतारकामाचा होता. टेबल, खुर्ची मोजमाप घेऊन बनवायचे होते. तेव्हा वाटले की अभिनेता बनण्यासाठी आलो होतो, हे सुतार बनवत आहेत. पण, तिसऱ्या वर्षात गेल्यानंतर आणि त्याहीनंतर लक्षात आलं की कलाकारासाठी ती ट्रेनिंग किती गरजेची आहे. सुतारकामाच्या ट्रेनिंगचा तुम्हाला कलाकार म्हणून फार उपयोग होतो. अभिनयात ती खोली येते.”

पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “एनएसडी दुसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांना भारताच्या विविध राज्यांत पाठवते. त्या-त्या राज्यांतील लोककला शिकून विद्यार्थ्यांनी ती सादर करायची असते. सुदैवाने आम्हाला महाराष्ट्र राज्य मिळाले होते. कमलाकर सोनटक्केजी आमचे प्रशिक्षक होते. ते सगळ्यात आधी आम्हाला कोकणात घेऊन गेले. कुडाळजवळ एक वलावल गाव आहे. तिथे आम्ही एक महिना दशावतार शिकलो. एक परफॉर्मन्स तयार केला व त्याचे दिल्लीमध्ये सादरीकरण केले. दोन महिन्यांची टूर होती, ज्यामध्ये आम्ही एक महिना दशावतार शिकलो. बाकीचा एक महिना आम्ही महाराष्ट्रातील विविध लोककला शिकलो. जे नाट्य-संगीत असतात, ते शिकलो. मुंबईत येण्याआधी नशिबाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणाची ओळख करून दिली होती.”

“जस जसे आपण शिकत जातो तेव्हा समजते की खूप काही शिकणे गरजेचे आहे. मला आता वाटते की, आयुष्यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दुसऱ्यांदा शिक्षण घेण्याची संधी मिळाली तर जास्त चांगले शिकू शकतो. त्यावेळी वाटायचे की हे लोक का वेळ वाया घालवत आहेत. कलाकाराला हे शिकण्याची काय गरज आहे? कधीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शिक्षण, ट्रेनिंग मिळत असेल आणि तुम्हाला ते आवडत नसेल तरीही ते शिका, कारण १०-१५ वर्षांनंतर त्या शिक्षणाचा अर्थ तुम्हाला समजू शकतो, अशी शक्यता आहे.”

हेही वाचा: “तो असता तर आयुष्य…”, ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री वडिलांबद्दल झाली व्यक्त, म्हणाली…

पंकज त्रिपाठी चित्रपटांबरोबरच वेब सीरिजमधूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहते. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या असल्याचे पाहायला मिळाले आहे.

Story img Loader