बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेते म्हणून पंकज त्रिपाठींना ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर पंकज त्रिपाठी यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजपर्यंत पंकज त्रिपाठी यांनी निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. नुकताच त्यांचा ‘मैं अटल हूं’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.
नुकतीच पंकज त्रिपाठींनी ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या अभिनयाबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत त्यांना ‘तुम्ही एक दिवसासाठी पंतप्रधान बनलात, तर काय कराल’, असा प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला पंकज त्रिपाठींनी गंमतीशीर उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “मी पंतप्रधान बनलो आहे यावर विश्वास ठेवण्यातच माझा संपूर्ण दिवस निघून जाईल अन् तेव्हा लक्षात येईल की आपल्याकडची वेळ संपली आहे.”
दरम्यान, या मुलाखतीत पंकज त्रिपाठींनी बॉलीवूडमधील नेपोटिजम (घराणेशाही)वर भाष्य केले. ते म्हणाले, “जगातील प्रत्येक क्षेत्रामध्ये नेपोटिजम आहे; पण प्रत्येक क्षेत्रामधील नेपोटिजम उजेडात येत नाही. पण, प्रतिभा ही प्रतिभाच असते. त्यामुळे व्यक्तीच्या प्रतिभा व कौशल्याच्या आधारावर त्यांना संधी मिळायला हवी.”
दरम्यान, पंकज त्रिपाठींच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर काही महिन्यांपूर्वीच त्यांचा ‘ओह माय गॉड २’ व ‘फुकरे ३’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नुकतीच त्यांची ‘कडक सिंह’ ही वेब सीरिज OTT वर प्रदर्शित झाली आहे. १९ जानेवारीला त्यांचा ‘मैं अटल हूं’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेपेक्षा कमी कमाई करताना दिसत आहे. पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने केवळ ६.७८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.