पंकज त्रिपाठी आज बॉलिवूडमधील सर्वात जास्त मागणी असलेल्या आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून त्यांना खरी ओळख मिळाली अन् मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. चित्रपट तसेच ओटीटी विश्वातही आज पंकज त्रिपाठी हे नाव प्रचंड लोकप्रिय आहे. परंतु एक काळ असा होता जेव्हा त्यांचे सीन्स चित्रपटांमधून हटवले जायचे, त्यांना फारच क्षुल्लक अशा भूमिका मिळायच्या.
‘दी लल्लनटॉप’शी संवाद साधताना पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या अशाच काही आठवणींविषयी खुलासा केला आहे. हृतिक रोशनच्या ‘लक्ष्य’ चित्रपटाबद्दलच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी काम केलं होतं पण ऐनवेळी त्यांचे सीन्स हटवण्यात आले. याबरोबरच ‘फुकरे २’च्या पोस्टरवरही त्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. याविषयी पंकज त्रिपाठी यांनी भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : KBC 15: अमिताभ बच्चन यांना एयर फोर्समध्ये जायचं होतं पण…’केबीसी १५’च्या सेटवर बिग बींनी सांगितली आठवण
याविषयी बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले, “मी ‘लक्ष्य’ चित्रपटात काम करणार आहे ही बातमी वृत्तपत्रातही छापून आली होती. त्यावेळी मला फार वाईट वाटलं कारण जर लोक वृत्तपत्रातील बातमी वाचून चित्रपट पाहायला गेले अन् मी त्यात दिसलो नाही तर त्यांना वाटेल मी खोटं बोललो. चित्रपट म्हणजे एक काल्पनिक कथाच आहे, आपण एक खोटी कथा रचतो अन् ती पडद्यावर साकारतो, पण मी खऱ्या आयुष्यात खोटं बोलू शकत नाही. वृत्तापत्रात आलं होतं की ‘बिहार का लाल दीखेगा फिल्म में’, पण मी त्या चित्रपटात नव्हतोच.”
याबरोबरच २०१७ च्या ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटाच्या वेळीही असाच काहीसा अनुभव पंकज यांना आला होता. “माझा कुणीही गॉडफादर नसताना मी या क्षेत्रात आलो किंवा या मुंबई शहरात माझा कुणीच शत्रूही नाही. ‘फुकरे २’च्या पोस्टरवर त्यावेळी इतर कलाकारांबरोबर त्यांनी एका व्हीएफएक्सचा वापर करून वाघाचा फोटो लावलेला. मी त्यांना बोललो की वाघाला या सिनेसृष्टीत करिअर घडवायचं नाहीये, पण मला घडवायचं आहे. त्यामुळे त्याजागी माझा फोटो घेतलात तर बरं होईल. पण अखेर हा एक प्रकारचा प्रवासच आहे आणि प्रत्येकाची योग्य वेळ येते.” पंकज त्रिपाठी नुकतेच ‘फुकरे ३’ व ‘ओह माय गॉड २’मध्ये झळकले.