पंकज त्रिपाठी आपल्या सहजसुंदर अभिनयाने पडद्यावर भूमिका करतात. विनोदी आणि गंभीर दोन्ही प्रकारच्या भूमिका तितक्याच ताकदीने निभावत, त्यांनी आपला खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’ या सिनेमात त्यांनी ‘रुद्रा भैय्या’ ही भूमिका साकारली होती. आता पंकज हे यश अनुभवत असले तरी, सिनेसृष्टीतील त्यांचे सुरुवातीचे दिवस खूप अवघड होते. या कठीण काळात त्यांच्या पत्नी मृदुला यांनी खूप साथ दिली होती, असं पंकज नेहमीच सांगतात.

पंकज त्रिपाठींना ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमातून लोकप्रियता मिळाली. त्याआधी त्यांनी खूप संघर्ष केला. पण तो संघर्ष पत्नीमुळे कमी झाला, असं ते म्हणतात. ‘द बेटर इंडिया’च्या मुलाखतीत पंकज यांनी सांगितलं की, जेव्हा ते अभिनेता म्हणून काम शोधत होते, तेव्हा मृदुलाने घराची जबाबदारी सांभाळली. “मी नेहमीच म्हणतो की, मृदुला आमच्या घरातील ‘पुरुष’ आहे,” असं पंकज म्हणाले. मृदुला आणि पंकज त्रिपाठी यांची प्रेमकहाणी चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे. मृदुलाने त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली होती.

हेही वाचा…‘आदिपुरुष’मध्ये रावण साकारल्यावर झाली टीका; सैफ अली खान पहिल्यांदाच झाला व्यक्त, म्हणाला…

मृदुला आणि पंकज यांची भेट

मृदुला म्हणाली, “मी पंकजला पहिल्यांदा माझ्या भावाच्या साखरपुड्यात पाहिलं होतं. नंतर कळलं की पंकज हा वधूचा धाकटा भाऊ आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये आम्ही भेटत राहिलो आणि त्यातूनच आमचं प्रेम फुललं.”

पंकज मृदुलासाठी ‘वर’ बघायला गेले

काही वर्षांनंतर मृदुलाच्या पालकांनी तिच्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली, तेव्हा पंकजही तिच्यासाठी वर संशोधन करत होते. “पंकज माझ्या भावाबरोबर माझ्यासाठी मुलगा पाहायला गेला होता. परत आल्यावर त्याने मला सांगितलं की, तो मुलगा माझ्यासाठी चांगला जोडीदार राहील आणि मला सगळी भौतिक सुखं मिळतील. मला त्या शब्दाचा अर्थ समजला नव्हता, म्हणून मी त्याला विचारलं. तेव्हा पंकजने सांगितलं की भौतिक सुख म्हणजे सुखसुविधा. त्या क्षणी मला वाटलं की, मी काहीतरी अतिशय मौल्यवान गमावतेय,” असं मृदुला म्हणाली.

हेही वाचा…‘हे’ दोन बॉलीवूड सुपरस्टार आहेत डेटिंग अ‍ॅपवर, उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, एक लोकप्रिय अभिनेत्रीसह आहे नात्यात

मृदुला यांनी लग्न मोडलं

जेव्हा पंकज नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी दिल्लीला निघाले, तेव्हा मृदुला यांनी त्याचं ठरलेलं लग्न मोडण्यासाठी योजना आखली. त्या म्हणाल्या, “माझं ठरलेलं लग्न मोडण्यासाठी मी किती प्रयत्न केले, ते फक्त मलाच माहीत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही गोष्ट पंकजला कशी सांगावी, हा मोठा प्रश्न होता.” शेवटी काही महिन्यांनी त्यांनी ही गोष्ट पंकजला सांगितली. त्यानंतर पंकज यांनी मृदुलाची दिल्लीला येण्याची व्यवस्था केली.

पंकज यांच्या बॉईज हॉस्टेल मध्ये राहिल्या मृदुला

दिल्लीला पोहोचल्यावर, मृदुला जिथे पंकज राहत होते, त्या मुलांच्या वसतिगृहातच काही दिवस राहिल्या. त्यांनी सांगितलं, “ते मुलं अजूनही मला चिडवतात की, मी ‘सत्ते पे सत्ता’मधल्या वहिनीसारखी अचानक आले आणि त्यांना पूर्ण कपडे घालायला लावले. कारण वसतिगृहात मुल पूर्ण कपडे घालत नाहीत.”

हेही वाचा…मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”

संघर्षाच्या काळात एकमेकांचा आधार

२००४ मध्ये पंकज आणि मृदुलाचे लग्न झाले आणि ते मुंबईला स्थलांतरित झाले. त्यांना एक मुलगी झाली. पतीच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढत मृदुला म्हणाल्या, “हो, तो काळ कठीण होता, पण आम्हाला कधीच असं वाटलं नाही की, आम्ही एकमेकांसाठी काही वेगळं करत आहोत. जसं, जर तुमचा एक हात दुखत असेल, तर दुसरा हात त्याचं काम करतो. तसंच काहीसं आमच्या बाबतीत घडलं. आम्ही फक्त आमचा संसार पुढे नेत होतो.”