प्रत्येक कलाकाराला आपल्याला वैविध्यपूर्ण भूमिका मिळाव्यात, असं वाटत असतं.एकाच पठडीतल्या भूमिका न करता, वेगळा ठसा उमटवणाऱ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी आपल्याला ओळखावं, असं अनेकांना वाटत असतं. परंतु, फार कमी कलाकारांना अशी संधी मिळते. विशेषत: विनोदी भूमिका करणाऱ्या कलाकारांसाठी हा प्रवास आनखी आव्हानात्मक ठरतो. त्यामुळे बऱ्याचदा कलाकार मंडळी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात.

अशातच आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनीदेखील त्यांच्या ‘हेरा फेरी’ या प्रसिद्ध चित्रपटातील गाजलेल्या ‘बाबूराव’ या भूमिकेबद्दल मत व्यक्त केलं आहे. ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, ” ‘हेरा फेरी’ या चित्रपटात मी साकारलेली भूमिका माझ्या गळ्याभोवतीचा फास झाला होता. सगळे जण फक्त त्या एका भूमिकेबद्दलच माझ्याशी बोलायचे आणि त्यामुळे मी एकदा २००६ साली ‘फिर हेरा फेरी’ प्रदर्शित झाल्यानंतर विशाल भारद्वाज यांना भेटायला गेलो. आणि त्यांना मला या वेशातली दुसरी भूमिका द्या फक्त ती यापेक्षा वेगळी द्या, असं म्हटलं होतं. त्यावर त्यांनी मी पात्रांचा रिमेक करीत नाही”, असं उत्तर दिलं. “त्यानंतर मी २०२२ साली आर. बल्की यांनाही तीच विनंती केली. कारण या भूमिकेमुळे मला विशिष्ट प्रकारच्या भूमिकेत अडकल्यासारखं वाटायचं आणि मी एक कलाकार आहे. त्यामुळे मला कायम वेगवेळे प्रयोग करायला आवडतं.

पुढे परेश यांनी ‘हेरा फेरी’ व ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांची तुलना ‘लगे रहो मन्ना भाई’ व ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’ या चित्रपटाशी केलेली पाहायला मिळालं. त्याबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे, “जेव्हा एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग काढला जातो तेव्हा त्यामध्ये त्याच त्या गोष्टी पाहायला मिळतात.” यापूर्वी सुद्धा परेश यांनी ‘हेरा फेरी’मुळे नाखुश असल्याचं म्हटलं होतं. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं, “फिर हेरा फेरी हा चित्रपट तितका चांगला नव्हता झाला.”

‘हेरा फेरी’ हा चित्रपट बॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. आजही या चित्रपटाची क्रेझ कायम असून, अनेक जण तितक्याच आवडीने हा चित्रपट बघताना दिसतात. चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल या त्रिकुटाची जबरदस्त जुगलबंदी बघायला मिळते. त्यामुळे चित्रपटाचा वेगळा चाहतावर्ग आहे. चित्रपटातील संवाद आजही अनेकदा मिमसाठी वापरले जातात.

‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकंना पोट धरून हसवलं. त्यामुळे चित्रपटलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. अशातच आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.