Paresh Rawal Reveals Drinking His Own Urine To Recover From Knee Injury : परेश रावल यांनी दुखापत बरी व्हावी, यासाठी लघवी प्यायल्याचं एका मुलाखतीत सांगितलं आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान परेश रावल यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ती बरी व्हावी, यासाठी त्यांनी उपचार घेतले नाही, तर लघवी प्यायचं ठरवलं. लघवी प्यायचा सल्ला त्यांना अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता.

राजकुमार संतोषी यांच्या ‘घातक’ चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीन करताना परेश रावल जखमी झाले होते. त्यांना टिनू आनंद, डॅनी डँझोगपा यांनी लगेच रुग्णालयात नेलं होतं. परेश दुखापतीमुळे घाबरले होते आणि या दुखापतीमुळे करिअर संपेल, अशी भीती त्यांना वाटत होती.

परेश रावल यांना विरू देवगणना दिलेला सल्ला

लल्लनटॉपशी बोलताना परेश रावल यांनी या घटनेबाबत सांगितलं. “मी नानावटी रुग्णालयात असताना वीरू देवगण (अजय देवगणचे वडील) मला भेटायला आले होते. मी तिथे असल्याचं समजताच ते माझ्याकडे आले आणि मला विचारलं की काय झालंय? मी त्यांना माझ्या पायाच्या दुखापतीबद्दल सांगितलं. त्यांनी मला सकाळी उठून लघवी प्यायला सांगितलं. सर्व फायटर्स असं करतात. असं केल्याने तुम्हाला कधीही कोणतीही समस्या होणार नाही, फक्त सकाळी उठून लघवी प्या. त्यांनी मला दारू, मटण किंवा तंबाखूचे सेवन करू नका, असं सांगितलं. नियमित सकस आहार घ्या आणि सकाळी लघवी प्या,” असा सल्ला दिला.

सल्ल्याचा झाला फायदा

लघवी प्यावी लागली तर नुसती गिळणार नाही, असा विचार परेश रावल यांनी केला. “मी लघवी बिअरसारखी घोट-घोट पिणार, कारण जर मला लघवी प्यायचीच असेल तर ती मी योग्य पद्धतीने पिणार. मी १५ दिवस प्यायलो आणि जेव्हा एक्स-रे रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांना एक्स-रेमध्ये एक पांढरी लायनिंग दिसली, ज्यावरून दुखापत बरी झाल्याचं स्पष्ट झालं,” असं परेश रावल म्हणाले.

डॉक्टर म्हणाले होते की अशा जखमा बऱ्या व्हायला दोन ते अडीच महिने लागतात, पण मी १५ दिवसांत बरा झालो. डॉक्टरांनाही हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता, असंही परेश रावल यांनी नमूद केलं.