दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा ‘हेरा फेरी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा चित्रपट अनेकजण आवर्जून बघतात. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. अशातच या चित्रपटात अक्षयच्या ऐवजी कार्तिक आर्यनची एंट्री झाल्याचे नुकतेच समोर आले होते. अभिनेते परेश रावल यांनी ट्विटरवर कार्तिकच्या एंट्रीचा खुलासा केला होता. प्रेक्षक या चित्रपटाच्या कास्टिंगवर नाराज असतानाच परेश रावल यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
परेश रावल यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘हेरा फेरी ३’च्या कास्टिंगवर प्रेक्षक जी नाराजी व्यक्त करत आहेत त्यावर त्यांचं मत मांडलं आहे. माझ्याबरोबर कोणते कलाकार स्क्रीन शेअर करत आहेत याकडे मी लक्ष देत नाही असं त्यांनी सांगितलं.
आणखी वाचा : “फक्त ३५ सेकंदांचा टीझर पाहून…”; क्रिती सेनॉनचं ‘आदिपुरुष’ला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर
परेश रावल म्हणाले, “चित्रपटात कोणाला घ्यायचं हा निर्णय पूर्णपणे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शकांचा आहे. मी त्यांच्या निर्णयात कधीही ढवळाढवळ करत नाही. माझ्याबरोबर कोण सहकलाकार असणार आहेत याचा मी कधीही विचार करत नाही. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो.”
हेही वाचा : “…तर चित्रपट पाहणार नाही”; ‘हेरा फेरी’च्या निर्मात्यांवर प्रेक्षक नाराज
अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’मधून बाहेर पडल्याने सगळेच चाहते चांगले नाराज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान आपल्याला काही गोष्ट पटल्या नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडल्याचं अक्षयने कबूल केलं होतं. तसंच त्याने प्रेक्षकांची त्याबद्दल माफीही मागितली होती. पण परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्याबरोबरच अक्षय कुमारही हवाच अशी चाहत्यांनी मागणी केली आहे. या तिघांशिवाय हा चित्रपट बनूच शकत नाही आणि बनला तरी तो आम्ही बघणार नाही असा पवित्रा प्रेक्षकांनी घेतला आहे.