बॉलिवूड दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन झालं आहे. ते ६७ वर्षांचे होते. आज(शुक्रवार, २४ मार्च) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
प्रदीप सरकार यांनी अनेक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘परिणीता’, ‘लगा चुनरी में दाग’, ‘हेलिकॉप्टर इला’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ चित्रपटाचं दिग्दर्शनही प्रदीप सरकार यांनीच केलं होतं. दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच्या निधनानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत.
प्रदीप सरकार यांनी चित्रपटांबरोबर अनेक म्युझिक व्हिडीओचंही दिग्दर्शन केलं आहे. २००५ साली त्यांनी ‘परिणीता’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील निवासस्थानी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.