‘लेडीज व्हर्सेस रिक्की बहल’ या चित्रपटातून अभिनेत्री परिणीती चोप्रानं बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण केलं. ‘इश्कजादे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘केसरी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये परिणीती झळकली. परिणीतीचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. परंतु, तिचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास काही सोपा नव्हता.
नुकताच परिणीतीचा ‘अमरसिंग चमकीला’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळालं. यादरम्यान परिणीतीनं एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर चित्रपटाची निवड ते चुकीचे निर्णय अशा अनेक गोष्टींबाबत परिणीती या मुलाखतीत बोलली आहे.
राज शामानी या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत परिणीती म्हणाली, “जेव्हा इम्तियाज सरांनी मला चमकीलामध्ये काम करण्याची संधी दिली तेव्हा ते म्हणाले की, तू खूप फिट दिसतेयस. या चित्रपटासाठी तू १६ किलो वजन वाढवावं, अशी माझी इच्छा आहे.”
हेही वाचा… थरारक चित्रपट ‘शैतान’ आता येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
परिणीती पुढे म्हणाली, “मला आठवतंय माझ्या एका सहकलाकारानं तेव्हा मला सांगितलं की, तू वेडी झाली आहेस. तू १६ किलो वजन वाढवलंस, तर तू तुझ करिअर संपवशील. हे सगळं तू नको करूस. त्या चित्रपटाला तू नकार दे. दुसरे कोणते तरी चित्रपट कर. पण, माझं मन मला आतून सांगत होतं की, मला १६ किलो वजन वाढवायचं आहे. मी दोन वर्षं अशीच घालवली तरी मला चालेल; पण मला ‘चमकीला’ करायचा आहे. मला ही भूमिका करायचीय. कारण- कोणत्याच दिग्दर्शकानं मला अशा भूमिकेसाठी विचारलं नव्हतं; ज्या प्रकारे इम्तियाज अलींनी मला विचारलं. त्यांनी मला असं काम दिलं; जे दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीनं मला नाही दिलं. म्हणून या चित्रपटासाठी मला माझं १०० टक्के द्यायचं होतं.”
“हा चित्रपट करण्याचा माझा हेतू खूप शुद्ध होता आणि मला माहीत होतं की मला जी भूमिका मिळतेय, तशाच भूमिकेची अपेक्षा माझे प्रेक्षक माझ्याकडून करतात. त्यांना नेहमीच माझा परफॉर्मन्स बघायचा असतो. प्रेक्षकांसमोर माझी प्रतिमा काय आहे हे मला माहीत आहे आणि माझे प्रेक्षकही मला माहीत आहेत.” असंही परिणाती म्हणाली.
“मी आधीपासूनच खूप चुकीच्या माणसांचं ऐकत गेली. आता मला स्वत:शीच प्रामाणिक राहायचंय. जर मला आवडणारी भूमिका असेल, तर एका वर्षात एक चित्रपट झाला तरी चालेल किंवा १० वर्षांत एक चित्रपट झाला तरी मला चालेल. पण, त्या चित्रपटासाठी मला चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचंय आणि चांगलं काम करायचंय.” असं परिणातीने नमूद केलं.
दरम्यान, इम्तियाज अली दिग्दर्शित ‘अमरसिंग चमकीला’ चित्रपटात परिणीतीबरोबर प्रसिद्ध गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ प्रमुख भूमिकेत झळकला आहे. हा चित्रपट ‘एल्विस ऑफ पंजाब’ म्हणून लोकप्रिय असलेले दिवंगत गायक अमरसिंग चमकीला यांच्या जीवनावर आधारित आहे.