बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. परिणीती व राघव चड्ढा यांना अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. परिणीतीच्या हातात अंगठी दिसल्याने त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. आता परिणीती व राघव चड्ढा यांच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांचं लग्न ठरलं आहे. दोन्ही कुटुंबीयांची लग्नाबाबत बोलणीही झाली असल्याची माहिती आहे. या वृत्तानुसार, परिणीती व राघव चड्ढा यांनी गुपचूप साखरपुडाही उरकला आहे. सध्या परिणीती व राघव दोघेही त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र आहेत. परिणीती व राघव लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
लग्नाच्या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत माहिती परिणीती व राघव चड्ढा यांच्याकडून मिळालेली नाही. पण, परिणीती व राघव चड्ढा चार महिन्यांत म्हणजेच २०२३च्या ऑक्टोबर मध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
परिणीती चोप्राची बहीण व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राही यादरम्यान भारतात येणार आहे. प्रियांका नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ‘जिओ मामी फिल्म फेस्टिव्हल’साठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे याच दरम्यान परिणीती व राघव चड्ढा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.